मातेने २ महिने दूध न पाजल्याने जुळ्या मुलींचा मृत्यू ? मुलाच्या अपेक्षेने जन्मलेल्या मुलींचा काटा काढल्याचा संशय


वृत्तसंस्था / बीड : जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील औरंगपूरा तांडा येथे खळबळजनक घटना घडली आहे. अनिता कुंडलिक चव्हाण या महिलेच्या दोन जुळ्या मुली एकाचवेळी मृत्यू पावल्या आहेत. या दोन्ही मुलींची प्रकृती उत्तम असताना अचानक दोघींचा मृत्यू संशयास्पद आहे. मुलाच्या अपेक्षेने जन्मलेल्या या मुलींचा काटा तर काढला नाही असा संशय निर्माण होत असून आरोग्य खात्याने पोलिसांकडे धाव घेतली आहे. गेवराईचे पोलीस प्रशासन काठोडा येथे पोहचले असून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर नीचांकावर आहे. वंशाला दिवा लागला पाहिजे, मुलगी नको मुलगाच जन्मला पाहिजे ही मानसिकता अजूनही बीड जिल्ह्यातील असंख्य गावांमध्ये प्रकर्षाने जाणवते. त्यातच शुक्रवारी एक दुर्देवी घटना घडली. अनिता चव्हाण यांनी २५ फेब्रुवारीला जुळ्या मुलींना जन्म दिला. बालिकांचे जन्मत: वजन दोन किलोच्या आसपास होते. ३ मार्च रोजी त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर अनिता चव्हाण माहेरी गेल्या. ९ मार्च रोजी बाळांचे वजन केले असता ते पावणेदोन किलो झाल्याचे दिसले. यावेळी अंगणवाडी कार्यकर्तीने त्यांना रूग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला. परंतु त्या रूग्णालयामध्ये गेल्या नाहीत. १३ मार्च रोजी दोन्ही मुलींचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.  Print


News - Rajy | Posted : 2019-04-13


Related Photos