महत्वाच्या बातम्या

 प्रगतिशील लेखक संघाची नागपूर विभागीय कार्यकारिणी गठित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : राष्ट्रीय पातळीवरील प्रगतिक विचारांच्या लेखकांची संघटना असलेल्या प्रगतिशील लेखक संघाची नागपूर विभागाची कार्यकारिणी अलीकडेच नव्याने गठित करण्यात आली आहे. अध्यक्ष म्हणून समीक्षक आणि दक्षिणायन महाराष्ट्र या अभियानाचे समन्वयक डॉ. प्रमोद मुनघाटे, सचिवपदी स्त्रीवादी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांची, तर कार्याध्यक्षपदी आंबेडकरी नाट्य चळवळीत गेली चार दशके कार्यरत असलेले ज्येष्ठ लेखक आणि नाट्यकर्मी संजय जीवने यांची निवड करण्यात आली आहे. 

प्रगतिशील लेखक संघाची स्थापना १९३३ मध्ये झाली. लेखक मुंशी प्रेमचंद हे १९३६ मध्ये लखनौ येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनाचे उद्घाटन विश्वकवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी केले होते. भारतातील विविध भाषांतील पुरोगामी विचारांचे लेखक या संस्थेशी जोडले गेले होते. त्यात निराला, सआदत हसन मंटो, फैज अहमद फैज, हमीद अख्तर, इस्मत चुगताई, अमृता प्रीतम, कैफी आजमी, भीष्म साहनी, गजानन माधव मुक्तिबोध, बाबा नागार्जुन, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, नारायण सुर्वे अशा ज्येष्ठ आणि परिवर्तनवादींचा समावेश होता. कार्यकारिणीत संघटकपदी कवी प्रसेनजित गायकवाड आणि डॉ. युगल रायलू यांची, उपाध्यक्षपदी प्रा. ज्योतीक ढाले, कोषाध्यक्षपदी तुषार कांती व सहसचिवपदी पुंडलिक तायडे यांची निवड करण्यात आली.

नागपूर येथे झालेल्या बैठकीला प्रगतिशील लेखक संघाचे राज्यस्तरीय कार्यवाह प्रा. प्रसेनजित तेलंग, विदर्भ विभाग प्रमुख साहित्यिक पवन भगत यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. तेलंग यांनी प्रगतिशील लेखक संघाची ऐतिहासिक भूमिका व नागपूर कार्यकारिणीचे वैदर्भीय प्रगतिशील साहित्य चळवळीतील आतापर्यंतचे महत्त्व विशद केले. बैठकीला नाशिक विभागाचे प्रा. सुदाम राठोड, सुरेश डांगे, बुद्धघोष तेलंग, तुषार कांती यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos