नक्षल्यांचे मनसुबे हाणून पाडत गडचिरोली पोलिस दलाने निवडणूक प्रक्रिया केली यशस्वी


- पोलिस अधीक्षकांनी केले जवानांचे कौतुक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या तसेच गडचिरोली पोलीसांसमोर मोठे आव्हान असलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हयातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०१९ ची मतदान प्रक्रिया काल ११ एप्रिल रोजी काही नक्षली घटना वगळता शांततेत पार पडली. नक्षल्यांचे मनसुबे हाणून पाडण्यात पोलिस विभागाला यश आले. यामुळे मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे.
१० एप्रिलपासून  गडचिरोली जिल्हयात मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नक्षल्यांनी मतदारांना भिती दाखविण्यासाठी बॅनरबाजी करत मतदान न करण्याचे आवाहन केले होते. परंतू याला न जुमानता गडचिरोली जिल्हयातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांनी नक्षल्यांनी लावलेले बॅनर जाळून टाकून मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. यामुळे विदर्भात सर्वाधीक म्हणजे ६९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 
नक्षल्यांनी घातपाताच्या उद्देशाने ठिकठिकाणी भुसुरूंग पेरून ठेवले होते. १० एप्रिल  रोजी पोमकें गट्टा (जां) हद्दीतील वटेली बुथ येथे पोलीस पार्टी जात असतांना दुपारी  भुसुरूंगाचा स्फोट होउन सिआरपीएफ चे दोन जवान जखमी झाले होते.  काल ११ एप्रिल रोजी   उपविभाग एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या  उपपोस्टे कसनसुर हद्दीतील वाघेझरी येथे सकाळी ११ ते  ११.३०  वा.चे दरम्यान भुसुरूंगचा स्फोट   घडवून आणला. परंतु यात कोणतीही हानी झाली नाही. तसेच सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान पोमकें गट्टा (जां.) हद्दीतील  टिटोळा येथे नक्षल्यांनी घातपाताच्या उद्देशाने पेरून ठवेलेले ४ भुसुरूंग निकामी करण्यात पोलीस दलास यश आल्याने मोठी हानी टळली. त्यानंतर  पोमकें हेडरी हद्दीतील पुरसलगोंदी गावाजवळ भुसुरूंगचा स्फोट होवुन गडचिरोली पोलीस दलातील २ जवान जखमी झाले असुन जखमींवर पुढील उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
नक्षल्यांचे मनसुबे हाणून पाडत पोलिस जवानांनी निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी परीश्रम घेतले. याबद्दल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जवानांचे कौतुक केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-12


Related Photos