चिखलगाव - लाडज वासीयांनी अखेर मतदानावर १०० टक्के बहिष्कार यशस्वी केलाच !


- प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ, लोकप्रतिनिधींनी फिरविली पाठ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज
: वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या व पुलाची प्रतिक्षा असलेल्या चिखलगाव आणि नवीन लाडज या २ हजार ५०० मतदारसंख्या असलेल्या गावांनी लोकसभा निवडणूकीवर टाकलेला बहिष्कार यशस्वी केला आहे. प्रशासनाने नागरीकांनी मतदान करावे, यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले असून ग्रामस्थांसोबत वाटाघाटी करणे लोकप्रतिनिधींनाही अवघड ठरले आहे. यामुळे आज ११ एप्रिल रोजी झालेल्या निवडणूकीत ब्रम्हपुरी तालुक्यातील चिखलगाव आणि नवीन लाडज येथील एकाही मतदाराने मतदान केले नाही.
चिखलगाव व लाडज ही गावे वैनगंगा नदीच्या काळावर वसलेली आहेत. या दोन्ही गावांच्या दरम्यान वैनगंगेचे मोठे पात्र आहे. या गावातील नागरीक वर्षानुवर्षे पुलाच्या निर्मितीची मागणी करीत आहेत. मात्र याकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी दूर्लक्ष केले आहे. निवडणूक घोषित झाल्यापासूनच या गावांनी लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे निवेदनातून प्रशासनाला कळविले होते. या बाबीची दखल घेत उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी गंभीर दखल घेवून वारंवार गावामध्ये बैठका घेतल्या. परंतु लोकप्रतिनिधींनी पूर्णतः दूर्लक्ष केले. यामुळे ग्रामस्थांनी १०० टक्के मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. चिखलगाव केंद्र क्रमांक ४७, ४८ या केंद्रावर ८४० , ६२९ मतदार असून लाडज मतदान केंद्र क्रमांक ४६ या केंद्रावर ९६३ एवढे मतदार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान पथकाने मन वळविण्याचाही प्रयत्न केला. परंतु गावकरी न जुमानता आपल्या कामाला निघून गेले. यामुळे मतदान केंद्राकडे कुणीही फिरकून पाहिले नाही.

- चिखलगाव येथील नागरीकांना समजावून सांगितले. मात्र गावकरी दूर्लक्ष करून आपआपल्या कामाला निघून गेले.
प्रा. उमेश इंदूरकर
केंद्राध्यक्ष, चिखलगाव 

- लाडज या गावाला मागील २६ वर्षांपासून ये - जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. पूलाचे बांधकाम करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. मात्र याकडे पूर्णतः दूर्लक्ष करण्यात आल्याने आम्ही बहिष्काराचा पवित्रा घेतला.
भोजराज दुर्योधन नंदागवळी
उपसरपंच, लाडज

- ग्रामपंचायत स्तरावरून लोकप्रतिनिधींना मागील २६ वर्षांपासून निवेदन दिले होते. मात्र कार्यवाही करण्यात आली नाही. तरीही मी शासनाच्या वतीने पुढाकार घेवून ग्रामस्थांना मतदान करण्यासाठी समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकरी आपल्या मतावर ठाम होते.
देवा सपाटे
ग्रामसेवक, लाडज  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-11


Related Photos