पारडीजवळ कारमधून ४ लाख ९८ हजार रूपये जप्त, कारमध्ये आढळली डाॅ.उसेंडी यांची प्रचारपत्रके


- दोघांना अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जास्त रक्कम बाळगणे आचारसंहीतेचा भंग आहे. मात्र असे असतानाही काॅंग्रेसची प्रचार पत्रके घेवून जात असलेल्या एका कारमधून पोलिसांनी ४ लाख ९८ हजार रूपये जप्त केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. सदर कारवाई काल ९  एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आली. या कारमध्ये काॅंग्रेसचे उमेदवार डाॅ. नामदेव उसेंडी यांची प्रचार पत्रके आढळून आली आहेत. कारमधून इम्रान खान मोहमुद खान पठाण व गितेश सुरेश परचाके दोन्ही रा. चिमूर जि. चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. या दोघांवर कलम १७१ (फ) , १७१ (ई ) १८८, ३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली पोलिस ठाण्याचे पथक १८ मार्चपासून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  चंद्रपूर मार्गावरील पारडी गावाजवळ वाहनांची तपासणी करीत आहेत. पथक प्रमुख तथा मंडळ अधिकारी एस.एस. बारसागडे, पथक  सहाय्यक वनरक्षक एन.व्ही. वेदांती, वाहन चालक विकास दुर्गे , छायाचित्रकार तुषार मेश्राम हे कर्तव्यावर असताना काल ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता एमएच ३४ एएम ७२९८ क्रमांकाच्या ह्युंडाई कारची तपासणी करण्यात आली. यावेळी कारमध्ये ४ लाख ९८ हजार रूपये आढळून आले. तसेच काॅंग्रेस पक्षाच्या प्रचाराचे साहित्य आढळून आले. रोख रक्कमेसह १५ लाख रूपयांचे वाहन असा एकूण १९ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
सदर रक्कम काॅंग्रेसच्या प्रचाराकरीता वापरली जात असल्याचा संशय असल्याने व निवडणूकीच्या कामाकरीता वाहन मालकाने कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याकडून परवाना घेतला नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-10


Related Photos