उज्वला योजनेतून गॅस जोडणी दिली, केरोसीन बंद केले आता गॅसही गेले, केरोसीनही गेले!


- गरीबांनी करायचे काय?
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: विद्यमान सरकारने गरीबांना दिले जाणारे केरोसीन टप्प्याटप्प्याने बंद केले. गॅस जोडणीधारकांना कायमचे केरोसीन बंद केले. देशातील लाखो गरीब नागरीकांना उज्वला योजनेतून गॅस जोडणी दिली. त्यांच्या राशन कार्डवर गॅस जोडणीचा  शिक्का मारला. यामुळे केरोसीन मिळणे बंद झाले. गॅसचे दर आवाक्याबाहेर झाल्याने गॅस सोडविणेही गरीबांना शक्य नाही. यामुळे आता गॅसही गेले, केरोसीनही गेले तर गरीबांनी जगायचे कसे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. यामुळे या निवडणूकीत गरीब जनता या सरकारला धडा शिकविणार असल्याचे दिसून येत आहे.
केरोसीनचा केवळ स्वयंपाकासाठीच नाहीतर अनेक कामांसाठी वापर केला जातो. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी केरोसीनचा वापर केला जातो. विजपुरवठा खंडीत झाल्यास दिवा पेटविण्यासाठी केरोसीनचा वापर केला जातो, जिथे विज पोहचली नाही तिथे केरोसीनचा गरीबांना आधार मिळतो. मात्र केरोसीनच बंद केल्याने करावे काय, असा प्रश्न पडला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही विज पोहचलेली नाही. या गावांमध्ये रस्ते व दळणवळणाच्या सोयी नाहीत यामुळे अत्यावश्यक सेवाही वेळेवर पोहचत नाहीत. मग विजपुरवठा नाही, केरोसीनही नाही तर जनतेने अंधारातच जगावे काय, हा सुध्दा प्रश्न उभा ठाकला आहे. मोठ्या शहरांमध्ये प्रेताचे दहन करण्यासाठी केरोसीन मिळत नसल्यामुळे डिझेलचा आधार घ्यावा लागत असल्याचे समोर आले आहे. सध्या केरोसीनचा दर जिएसटीसह ३५ रूपयांच्या जवळपास आहे. मात्र डिझेल खरेदीसाठी नागरीकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. 
उज्वला गॅस योजनेचा गाजावाजा करण्यात आला. १०० रूपयांत गॅस जोडणी देण्यात आली. मात्र गॅसचे दर ९०० रूपये करून अतिरिक्त ५०० रूपये गरीबांच्या खिशातून काढणे सुरू झाले. गॅसजोडणीची रक्कम वसूल होत नाही तोपर्यंत अनुदान दिले जाणार नाही, असे धोरण आखले. यामुळे गरीब जनता कुठून आणणार ९०० रूपये. याचा परिणाम गॅस जोडणी घरात अडगळीत पडली आणि केरोसीनही बंद झाले. यामुळे आता अंधारात जीवन जगण्याची वेळ अनेकांवर आली आहे. 
गॅस जोडणी नसलेल्या शिधापत्रिकाधारकांनाच केरोसीन मिळते. यासाठी केरोसीन दुकानदारांना पिओएस मशिनचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच केरोसीन वितरीत करण्यात येणाऱ्या व्यक्तींकडून हमीपत्र घेण्याचे आदेश शासनाने काढले. राज्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत ८८ लाख शिधापत्रिकाधारकांना केरोसीन वितरीत करण्यात येते. यासाठी ५९ हजार ५३५ केरोसीन परवाधारकांची नेमणूक करण्यात आली आहे. गॅस जोडणी नसलेल्यांनाच केरोसीन देण्याच्या निर्णयामुळे केरोसीनच्या वितरणात ३० टक्के बचत झाली आहे. मात्र यामुळे गरीब जनतेचे जीवन अंधारमय झाले आहे. यामुळे सरकारवर जनता नाराज असून या निवडणूकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-09


Related Photos