भामरागड तालुक्यात विजेचा लपंडाव, महावितरणचे दूर्लक्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : ऐन उन्हाळ्याच्या दिवसात भामरागड तालुक्यातील नागरीकांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत असून याकडे महावितरणचे दूर्लक्ष होत आहे. सध्या तापमानात वाढ झाली असल्याने नागरीकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
भामरागड तालुक्यात १२८ गावे आहेत. तालुका घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. तसेच नक्षलग्रस्त तालुका अशी ओळख आहे. १२८ गावांपैकी बहूतांश गावात महावितरणची विज पोहचलेली नाही. तालुका मुख्यालयीच विजेचा लपंडाव सुरू असते. यामुळे दुर्गम भागातील इतर गावांची स्थिती काय असेल, याची कल्पना न केलेलीच बरी.
दिवसातून अनेकदा विजपुरवठा खंडीत होतो. रात्रीही वारंवार विजपुरवठा येत - जात राहते. विज पुरवठा खंडीत झाल्यावर उकाड्याचा तसेच डासांचा त्रास सहन करावा लागतो. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर महावितरणच्या कार्यालयात ग्राहक संपर्क साधतात. मात्र प्रतिसादच दिला जात नाही. विजपुरवठा कधीपर्यंत सुरळीत होईल, याची माहिती दिली जात नाही. यामुळे असाच त्रास किती दिवस भोगायचा असा प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला आहे.
News - Gadchiroli | Posted : 2019-04-09