मासळ (बूज) येथे वाघाने पाडला बैलाचा फडशा, एक बैल जखमी


- वनविभागाचे दुर्लक्ष
-   दिवसेंदिवस  घटना घडत असताना वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाचा नकार
- 'कोणी वाघ पकडता का वाघ' अशी परिस्थिती  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मासळ (बूज) :
चिमूर तालुक्या मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर  असलेल्या व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी  असलेल्या मासळ (बुज) येथे रात्रीच्या सुमारास वाघाने एका बैलाची शिकार केली  तर एका बैलास घायाळ केले आहे.
अमर गंधारे नामक इसमाने आपले बैल  शेतात बांधून ठेवले होते.  रात्रीच्या सुमारास वाघाने हल्ला करून एका बैलास ठार केले आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात वाघाने बस्तान मांडलेले  आहे,  या परिसरात वाघाची दहशत कायमच आहे. दोन आठवड्याअगोदर माणेमोहाळी परिसरात वाघाने एक शेतकऱ्यावर हल्ला केला होता . मात्र त्यात ते बचावले व त्यानंतर त्या वाघाला वनविभागाने मासळ (बुज)- नंदारा परिसरात हाकलून लावण्यात आले होते.  मागील आठवड्यातसुद्धा  मासळ(बूज)-तुकुम परिसरातील तुकुम येथील बांबू रिसोर्ट च्या मागे असलेल्या तलावात महिला कपडे धूत असताना वाघाचे दर्शन झाले होते.   दिवसेंदिवस अशा घटना घडत असून वनविभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. घटनास्थळी वन विभाग पोहचते . परंतु वाघाला जेरबंद केले जाणार  नाही असे बोलल्या जाते. त्यामुळे 'कोणी वाघ पकडता का वाघ ' अश्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दिवसेंदिवस या वाघामुळे  परिसरात जीवितहानी   घडत असताना सुद्धा वन विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.  जेव्हा वाघ एखाद्या इसमाच्या नरड्याचा घोट घेईल तेव्हा वन विभागाला जाग येऊन वाघाला जेरबंद करतील का असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे. तसेच या चिमूर विधानसभा क्षेत्रातील आमदार बंटी  भांगडिया तसेच मासळ (बुज)- मदनापूर क्षेत्रातील जि.प.सदस्य गजानन बुटके या लोकप्रतिनिधींचे  सुद्धा  घटना घडत असताना दुर्लक्ष दिसत आहे.  मतदान असताना लोकप्रतिनिधी भेटावयास, समस्या जाणून घेण्यास येत असतात मात्र अशी घटना घडली लोकप्रतिनिधी का बर फिरकत नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
या परिसरातील विद्यार्थी मासळ(बूज) येथे शिक्षणासाठी येत असतात.  परंतु  वाघाच्या दहशतीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे.   पुन्हा अनुचित घटना घडू नये यासाठी वनविभागाने तातडीने निर्णय घेऊन वाघाला जेरबंद करून योग्य त्या ठिकाणी सोडावे अशी मागणी नागरिकांकडून  होत आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-09


Related Photos