प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रावरील ‘व्हीव्हीपॅट’ पावत्यांची मोजणी करावी : सुप्रीम कोर्ट


- निकाल उशिराने लागण्याची शक्यता 
वृत्तसंस्था / नवीदिल्ली : 
 प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रावरील ‘व्हीव्हीपॅट’ पावत्यांची मोजणी करावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीचे निकाल उशिराने लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा तीन दिवसांवर आला असतानाच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला हे  महत्वपूर्ण आदेश दिले आहेत.
सध्या निवडणूक आयोगाकडून विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही एका मतदार केंद्रावरील ‘व्हीव्हीपॅट’ पावत्या मोजण्याची पद्धत आहे. मात्र, या पद्धतीमध्ये बदल करताना सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदार केंद्रांवरील ‘व्हीव्हीपॅट’ पावत्यांची मोजणी करावी, असे आदेश दिले.
सध्या निवडणूक आयोगाकडून देशभरात ४ हजार १२५ ‘व्हीव्हीपॅट’ मशीन्सची मोजणी केली जात होती. आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर व्हीव्हीपॅट मोजणी पाचपट केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला २० हजार ६२५ व्हीव्हीपॅट मशीन्सच्या पावत्यांची मोजणी करावी लागेल. त्यामुळे निकालास थोडा वेळ लागेल. एक ते दीड दिवस लागू शकतो असा अंदाज आहे. २३ मे रोजी लोकसभेचे निकाल आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमशी जोडलेल्या ५० टक्के वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल (व्हीव्हीपॅट) पावत्यांची मोजणी करण्याची मागणी काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी केली होती. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती. तसेच सध्याची पद्धत सर्वांत उपयुक्त आहे, असा दावा आयोगाने केला होता. मात्र, न्यायालयाने आयोगाचे म्हणणे ग्राह्य मानले नाही.   Print


News - World | Posted : 2019-04-09


Related Photos