राज्य निवडणूक आयोगाने जप्त केला ९७ कोटींचा मुद्देमाल, ४४ कोटींचे सोने व १७ कोटींच्या दारू चा समावेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / मुंबई :
आचारसंहितेच्या नियमानुसार आजवर राज्य निवडणूक आयोगाने ९७ कोटींचा मुद्देमाल जप्त केला असून, यात ४४ कोटींचे सोने, चांदी व मौल्यवान जवाहिर, ३० कोटींची रोकड, १७ कोटींची दारू आणि ४.६१ कोटींचे मादक पदार्थ आदींचा समावेश असल्याचे आयोगाने म्हटले आहे. 
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघात ११ एप्रिप्ला मतदान होत असून, त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. गडचिरोली, चिमूर मतदारसंघातील अतिदुर्गम भागातील ३५ मतदान केंद्रांसाठी निवडणूक अधिकारी व कर्मचारी सोमवारी रवाना करण्यात आले. अतिदुर्गम भागात निवडणूक कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. 
पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. त्यामध्ये वर्धा मतदारसंघात १४ उमेदवार निवडणूक लढवत असून, रामटेक १६, नागपूर ३०, भंडारा-गोंदिया १४, गडचिरोली-चिमूर ५, चंद्रपूर १३ आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघात २४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पोलिस बंदोबस्त व अन्य सुरक्षा बलांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे शिंदे म्हणाले. 
आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सी-व्हिजिल ॲपचा राज्यभरात नागरिक प्रभावी उपयोग करीत आहेत. आतापर्यंत दोन हजार ५२७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी एक हजार ४९७ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून, चौकशीअंती आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे. सी-व्हिजिल ॲपवर अनधिकृत दारू, मतदारांना प्रलोभन म्हणून दारूचे वाटप, पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आदी स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.   Print


News - Rajy | Posted : 2019-04-09


Related Photos