महत्वाच्या बातम्या

 पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरण तर्फे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : पावसासोबत येणाऱ्या वादळ वाऱ्यामुळे, अतिवृष्टी, तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे .

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी 24 तास सुरु असणार्‍या कॉलसेंटर्सचे 1800-212-3435 किंवा 1800-233-3435, 19120, 1912 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे. वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना केवळ एकदाच ग्राहक क्रमांक सांगावा लागणार आहे. तसेच महावितरण च्या मंडळ स्तरावरील नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधता येईल. चंद्रपूर मंडलातील  ग्राहकांनी 7875761195 व गडचिरोली मंडलातील  ग्राहकांनी 7875009338 यावर संपर्क साधावा. अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करण्यात येतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. तसेच ईएलसीबी वापरावे. घरात  शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. याशिवाय विजेच्या खाबांना जनावरे बांधू नयेत, त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos