भामरागड तालुक्यातील मौल्यवान वनसंपदा वणव्याच्या विळख्यात, वनविभागाचे नियोजन शुन्य


-  वनविभागाच्या कार्यालयापासून १ किमी अंतरावरच धगधगतेय जंगल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार / भामरागड :
तालुक्यात मौल्यवान वनसंपदा आहे. मात्र ही मौल्यवान वनसंपदा सध्या वणव्याच्या  विळख्यात सापडून नेस्तनाबूत होत असून याला वनविभागाचा नियोजनशुन्य कारभार कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून भामरागड वनविभागाच्या कार्यालयापासून केवळ १ किमी अंतरावर जंगल धगधगत आहे. मात्र या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले जात नसल्याचे दिसून येत आहे. भामरागड तालुक्यातील जंगल ताडगाव, भामरागड, गट्टा वनपरीक्षेत्रात विभागून सिमा आखण्यात आल्या आहेत. या वनपरीक्षेत्रांतर्गत नेमणूकीस असलेले कर्मचारी किती काळ कर्तव्य बजावतात याचा काही ठावठिकाणा नाही. यावर्षी जानेवारी महिन्यापासूनच जंगल सुकायला सुरूवात झाली. मार्च महिन्यात गवतासह लहान मोठी झाडे करपली. यामुळे थोडीशीही ठिणगी पडली तरी भडका उडून संपूर्ण जंगल आगीच्या विळख्यात सापडत आहे. दोन दिवसांपूर्वी जंगलात आग लागली. या आगीत झाडे, मौल्यवान संपदा जळून खाक झाली आहे. काही भाग अतिक्रमणाने वेढलेला आहे. काही भागात उपद्व्यापी लोक आग लावून देत आहेत. यामुळे तालुक्यातील जंगल नष्ट होण्याची भिती व्यक्त होत आहे. वनविभागाने वणव्यावर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसे निर्देशसुध्दा वनविभागास आहेत. मात्र बहूतांश अधिकारी, कर्मचारी आलापल्ली येथून ये - जा करतात. यामुळे नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास वेळेवर कर्तव्यावर पोहचू शकत नाहीत. रस्त्यालगतचा परिसर स्वच्छ करून ठेवण्यात आला आहे. यामुळे ठरवून दिलेल्या उपाययोजना संपल्या असे समजून कर्मचारी हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. काल ७ एप्रिल रोजी वनविभागाच्या कार्यालयापासून १ किमी अंतरावर वणवा धगधगत होता. मात्र याकडे सुध्दा दूर्लक्ष करण्यात आले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-08


Related Photos