महत्वाच्या बातम्या

 मतदार नोंदणीसाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


-  विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा

-  राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमादरम्यान जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतला. नागरीकांच्या सोईसाठी भारत निवडणूक आयोगाने ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे व्होटर हेल्पलाइन ॲप मोबाईल ॲप्लीकेशनद्वारे देखील मतदार नोंदणी घर बसल्यास करता येते. त्याचप्रमाणे नागरिकांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, मतदार केंद्रस्तरी अधिकारी देखील ऑफलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करून अर्ज सादर करण्याची सुविधा आहे.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण उपक्रमादरम्यान २१ जुलै ते २१ ऑगस्ट या महिण्याभराच्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जावून नोंदणी न केलेले पात्र मतदार, १ जानेवारी २०२३ रोजी पात्र  उमेदवार, १ जानेवारी २०२४ रोजी संभाव्य पात्र मतदार, पुढील अर्हता दिनांकास पात्र संभाव्य मतदार, एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरूपी मयत मतदार, मतदार यादितील नोंदीत दुरूस्ती इत्यादी तपासणी करून माहिती गोळा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले.

प्रत्येक गावामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, गावातील वरिष्ठ नागरिक यांचा गट तयार करून त्यांच्याकडून मतदार यादी तपासून घ्यावी, मयत व कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदाराबाबत संबंधितांकडून फॉर्म ७ नंबर भरून घ्यावे. मयत व कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून पडताळणी करून पंचनामा, फॉर्म नंबर ७, सुनावणीच्या आधारे मतदार यादीतून नोंदणीची वगळणी करण्यात यावी, याबाबत बैठकीत निर्देश दिले.

कार्यक्रमादरम्यान मतदारांना आपले मतदान ओळखपत्र दुरूस्ती, नवमतदार नोंदणी, मतदान ओळखपत्र आधार कार्डशी जोडणी, मतदार यादीतील नाव कमी करणे अशी सर्व कामे करता येणार आहे. मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. मतदान नोंदणी वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत देखील बैठक घेतली. विविध राजकीय पक्ष व त्यांच्या प्रतिनिधींनी मतदान नोंदणी वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.





  Print






News - Wardha




Related Photos