महत्वाच्या बातम्या

 कोरोनामुळे पालक व पती गमावलेल्यांना विविध योजनांचा लाभ द्या : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- जिल्हाधिकाऱ्यांकडून कृती दल व बालसंरक्षणचा आढावा
- कोरोनात पालक गमावलेल्या बालकांना ३२ लाखाचे सहाय्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : कोरोनामुळे अनेक बालकांना आपल्या पालकांना तर काही महिलांना आपल्या पतीला गमवावे लागले. असे बालक व विधवा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा प्राधान्याने लाभ द्या. काही ठिकाणी लाभार्थ्यांना शक्य नसल्यास त्यांचे अर्ज संबंधित विभागांनी भरून घ्यावे, असे निर्देश राहुल कर्डिले यांनी दिले.

जिल्हा कृती दल व बाल संरक्षण कक्षाच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत विधाते, महिला व बालविकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय मेहेर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी माधुरी भोयर आदी उपस्थित होते. कोरोनामुळे दोनही किंवा एक पालक गमावलेली बालके व पती गमावलेल्या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. त्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यात ४६४ बालकांनी आपले एक किंवा दोनही पालक गमावलेले आहेत. अशा बालकांना बाल न्याय निधीमधून आर्थिक सहाय्य वितरीत केले जाते. जिल्ह्यात अशा पालक गमावलेल्या ३६७ बालकांना ३२ लाख ५३ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरीत करण्यात आले आहे. ज्या बालकांचे अद्याप अर्जच प्राप्त नाही, अशा ठिकाणी विभागाने स्वत: संपर्क साधून अर्ज भरून घ्यावेत व त्यांना लाभ द्यावा, अशा सुचना बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. महिला व बालकांसाठी शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. पालक व पती गमावलेले बालक व महिलांना या योजनांचा प्राधान्याने लाभ द्या. या लाभार्थ्यांचे अर्ज भरून घ्या. त्यांच्याशी थेट संपर्क साधा. महिला व बालके कोणकोणत्या योजनेसाठी पात्र ठरतात त्याचा आढावा घ्या. जास्तीत जास्त महिला व बालकांना योजनांचा लाभ दिला गेला पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी बालविवाहांचा देखील आढावा घेण्यात आला. बाल विवाह होणार नाही. याची दक्षता घ्या, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी सोबतच बाल संरक्षण कक्षाच्या कामकाजाचा देखील आढावा घेतला. बालगृहातील बालकांचे लसीकरण, आकांक्षा शिशु कल्याण केंद्र, बालगृहांची तपासणी, बालकामगार आदींचा आढावा घेतला. जिल्ह्यात कुठेही बालकामगार कोणत्याही कामावर राहणार नाही, याची दक्षता घ्या. बालकामगार ठेवल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले.





  Print






News - Wardha




Related Photos