भाजपाची एकहाती सत्ता असलेल्या गडचिरोली नगर परिषदेच्या आवारात डुकरांचे बस्तान


- शहरातीलही अनेक वार्डांमध्ये डूकरांचा वावर 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असलेल्या गडचिरोली नगर परिषदेच्या आवारातच डूकरांनी बस्तान मांडले असून दिवसभर नगर परिषदेच्या आवारात डूकरे हुंदडत असतात. यामुळे नगर परिषदेचे आवारच स्वच्छ राहत नसेल तर स्वच्छ शहर, सुंदर शहर कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली. या अभियानाची सुरूवात गडचिरोली नगर परिषदेनेही केली. भाजपाची एकहाती सत्ता असल्यामुळे तसेच केंद्रात व राज्यातही भाजपाचेच सरकार असल्यामुळे नगर परिषदेला मोठ्या प्रमाणात निधी मिळेल व नगर परिषद आणि शहरातील स्वच्छता केली जावून शहर स्वच्छ व सुंदर होईल, अशी आशा नागरीकांना होती. मात्र स्वच्छता अभियानाकडे केवळ विशिष्ट दिवशीच लक्ष देवून झाडू घेवून फोटोसेशन करण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी केले. यामुळे शहरात कुठेही स्वच्छता दिसून येत नाही. 
काही दिवसांपूर्वी डुकरे पकडण्याची मोहिम राबविली. काही डूकरे पकडल्यानंतर पथक परत पाठविण्यात आले. मात्र डुकरांची संख्या काही कमी झाली नाही. शहरातील विविध वार्डांसोबतच आता नगर परिषदेच्या आवारातही डुकरे हुदंडतांना दिसून येत आहेत. घाण पसरवित आहेत. तरीही पदाधिकाऱ्यांचे किंवा प्रशासनाचे लक्ष नाही.
केवळ निवडणूका आल्या की, हे अभियान राबविले, या योजना राबविल्या हे सांगण्यासाठी नगरसेवक, पदाधिकारी वार्डा - वार्डातल्या नागरीकांसोबत संवाद साधतात. मात्र नगर परिषदेच्या आवारातच डूकरे घाण करीत असलेले त्यांच्या नजरेस पडत नाही. यामुळे एकहाती सत्तेचे दुष्परिणाम भोगण्याची वेळ गडचिरोलीकरांवर आली असल्याचे दिसून येत आहे. सध्या लोकसभेची निवडणूक असून प्रचारासाठी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी वार्डा वार्डात जात आहेत. किमान आतातरी शहरातील परिस्थिती जाणून घ्यावी अशी मागणी होत आहे.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-08


Related Photos