गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात निवडणूक आहे एवढेच माहित, उमेदवार किंवा पक्ष माहितच नाही!


- मात्र प्रशासनाची दुर्गम भागात जोरदार जनजागृती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक येत्या ११ एप्रिल रोजी होत आहे. या लोकसभा क्षेत्रात पाच उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. सध्या प्रचार मोहिम सुरू आहे. मात्र दुर्गम भागातील गावांमध्ये प्रचार यंत्रणा किंवा उमेदवार पोहचलेच नसल्यामुळे दुर्गम गावातील मतदारांना निवडणूक आहे, एवढेच माहित. पक्ष किंवा कोणता उमेदवार रिंगणात आहेत, याची माहितीच नाही. याउलट प्रशासन मात्र दुर्गम भागात पोहचले असून मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदारांनी पुढे यावे यासाठी मराठी, तेलगु, माडीया, बंगाली आदी भाषांमधून जनजागृती करीत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावे दुर्गम आहेत. या गावांमध्ये जाण्यासाठी अद्यापही रस्ते नाहीत, वाहने पोहचत नाहीत, मुलभूत सोयी - सुविधा नाहीत. निवडणूकीच्या काळात तरी उभे असलेले उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी येतील, अशी आशा येथील मतदारांना आहे. मात्र उमेदवार सोडा पक्षाचे कार्यकर्तेसुध्दा पोहचत नाहीत. अद्यापही काही गावांमध्ये झेंडे, बॅनर, पत्रके दिसून येत नाहीत. यामुळे उमेदवार कोण हेच माहित नसल्याने निवडणूक आहे, वेळेवर पाहून मतदान करू, असे मतदार बोलून दाखवित आहेत.
काही गावातील नागरीकांच्या मते पाच वर्षात खासदार, आमदार किंवा इतर कोणी लोकप्रतिनिधी गावात बघितलाच नाही. खासदार किंवा आमदार कोण हे सुध्दा माहिती नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं, या गोष्टी आम्हाला काय माहित, असेही काही नागरीक बोलून दाखवित आहेत. यामुळे या गावांची काय अवस्था असेल याची कल्पना येते.
अनेक गावांमध्ये विजपुरवठा नाही. यामुळे दुरदर्शनवरील बातम्यासुध्दा बघता येत नाहीत. प्रचाराचे साहित्य पोहचले नाहीत. इंटरनेटच्या अभावामुळे सोशल मिडीयापासूनही येथील जनता दूर, मग बाहेरच्या जगातील घडामोडी त्यांना कळणार तरी काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे दुर्गम भागातील मतदार प्रशासनाच्या जनजागृतीनंतर किती पुढे येतात आणि कोणत्या पक्षाला किती मते पडतात हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-08


Related Photos