राज्यात तापमानात आणखी वाढ होणार, विदर्भात पावसाची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
राज्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसानंतर उकाड्यात वाढ झाली असून, पुढील चार ते पाच दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होऊन उन्हाचा चटका वाढणार आहे.  पुढील तीन दिवस विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता  हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  विदर्भात अमरावती, चंद्रपूर, नागपूर आदी ठिकाणी ४३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद होत असून, या भागात सर्वाधिक उकाडा आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये ४ आणि ५ एप्रिलला उष्णतेची लाट होती. काही ठिकाणी गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास किंवा त्यापुढेही नोंदविला जात आहे. कमाल तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत दोन ते चार अंशांनी वाढ नोंदविली जात आहे. कोकण विभागातही तापमानात काहीशी वाढ नोंदविण्यात येत आहे.
कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीचा उकाडा वाढत आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. शनिवारी विदर्भातील वर्धा येथे ४३.४ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुण्यात तापमान ४० अंशांच्या आसपास आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे ३३ अंश तापमान होते. मराठवाडय़ातील बीडमध्ये ४१ अंशांपुढे तापमान आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-04-07


Related Photos