महत्वाच्या बातम्या

 नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा


-  यावर्षी ९ हजार निरक्षरांना साक्षर करण्याचे उदिष्ट
-  जिल्ह्यात कार्यक्रम राबविण्यासाठी स्वयंसेवक नेमणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : केंद्र शासनाच्यावतीने नव भारत साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. साक्षरतेकडून समृध्दीकडे अशी या कार्यक्रमाची टॅग लाईन आहे. कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात यावर्षी ९ हजार ३११ निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात हा कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्यासाठी विविध क्षेत्रातील स्वयंसेवकांची नेमणूक करा. त्यांना प्रशिक्षण द्या, असे निर्देश बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त निता औघड, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मंगेश घोगरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

देशातील १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींना साक्षर बनविण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. साक्षर बनविण्यासोबतच त्यांच्यात जीवन कौशल्य विकसित करणे, या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरुकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण याबाबींचा देखील समावेश आहे. हा कार्यक्रम मार्च २०२७ पर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्याला यावर्षी ९ हजार ३११ निरक्षरांना साक्षर बनविण्याचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमासाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळांव्यतिरिक्त शिक्षक पदाचे शिक्षण घेणारे, उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी, पंचायत राज संस्था, अंगणवाडी सेविका, आशा, नेहरू युवा केंद्र, एनएसएस, एनसीसी अशा ठिकाणच्या स्वयंसेवकांना निरक्षरांना साक्षर करण्यासाठी नेमणूक करण्यात येणार आहे. शाळांमध्ये सकाळी एक तास आणि सायंकाळी एक तास साक्षरता वर्ग घेतले जातील.
पुर्वी निरक्षरांना शिक्षित करण्यासाठी प्रौढ शिक्षण ही संज्ञा वापरली जायची. आता याऐवजी या कार्यक्रमांतर्गत सर्वांसाठी शिक्षण ही संज्ञा वापरली जाणार आहे. स्थानिक पातळीवर निरक्षर व स्वयंसेवकांचे सर्वेक्षण शाळास्तरावर केले जाणार आहे. निरक्षरांना शिक्षित करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या स्वयंसेवकांसह इतरही ईच्छूक व्यक्ती, संस्था स्वयंसेवक म्हणून काम करू शकतील. अशा स्वयंसेवकांची नेमणूक करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. नेमणूक केलेल्या सर्व स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos