भावाच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावास


- गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सुरेंद्र आर. शर्मा यांचा निर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
पोटावर सुरीने वार करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या  आरोपीस गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सुरेंद्र आर. शर्मा यांनी पाच वर्षे सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड ठोठावला आहे.
संतोष पत्रुजी चलाख असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याची पत्नी मायाबाई चलाख हिला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील फिर्यादी विश्वनाथ चलाख यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार १८  ऑगस्ट  २०१६  रोजी विश्वनाथ चलाख हा घरी असताना सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान भांडणाचा आवाज आला. त्याने घराबाहेर येवू बघितले असता संतोष चलाख व त्याची पत्नी मायाबाई चलाख हे विश्वनाथ व संतोष याची आई शारजाबाई पत्रुजी चलाख हिला  नालीत ढकलून मारहाण करत होते. यावेळी विश्वनाथ चलाख याने आईस मारहाण करीत असल्याबाबत जाब विचारला. यावेळी संतोष याने विश्वनाथ सोबत भांडण करून घरातून लोखंडी सुरी आणली व विश्वनाथच्या पोटावर वार केला. यावेळी मायाबाई चलाख ही आतडी बाहेर निघाली नाही त्याला जिवानिशी ठार कर अशी म्हणून शिवीगाळ करीत होती. यावेळी विश्वनाथ गंभीर जखमी झाला. तो रस्त्यावर कोसळला. यानंतर रात्री ९ वाजताच्या दरम्यान गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 
चामोर्शी पोलिसांनी जखमी विश्वनाथ याचे बयाण नोंदवून घेतले. पोलिसांनी कलम ३०७ , ३२३ , ३४  भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपी संतोष चलाख व मायाबाई चलाख यांच्याविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात न्यायाधिश सुरेंद्र आर. शर्मा यांनी आरोपी संतोष चलाख याला आज ४ एप्रिल रोजी कलम ३०७  भादंवी नुसार ५  वर्षे सश्रम कारावास तसेच १ हजार रूपये दंड ठोठावला. मायाबाई चलाख हिच्याविरूध्द ठोस पुरावा आढळून न आल्याने निर्दोष मुक्त करण्यात आले.
सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सचिन कुंभारे यांनी काम बघितले. गुन्ह्याचा तपास चामोर्शी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गोपाल महादेवराव ढोले यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी काम बघितले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-04


Related Photos