आर्थिक चणचणीमुळे बीएसएनएलची कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची योजना


- ५४ हजार कर्मचाऱ्यांची बीएसएनएलमधून काढणार  
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
: आर्थिक चणचणीमुळे डबघाईला आलेल्या बीएसएनएलने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची योजना तयार केली आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयातही दोन वर्षाची कपात करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावच बीएसएनएलने तयार केला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी देताच या प्रस्तावानुसार सुमारे ५४ हजार कर्मचाऱ्यांची बीएसएनएलमधून सुट्टी करण्यात येणार आहे. 
बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील ५० वर्षावरील कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्तीची योजना तयार करण्यात आली आहे. हा प्रस्ताव येत्या एक-दोन दिवसांतच केंद्रीय मंत्रिडळाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यात येणार असल्याचं बीएसएनएलच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)मध्ये १.७६ लाख कर्मचारी आहेत. तर एमटीएनएलमध्ये २२ हजार कर्मचारी आहेत. येत्या पाच-सहा वर्षात एमटीएनएलमधील १६ हजार आणि बीएसएनएलमधील ५० टक्के कर्मचारी निवृत्त होणार असल्याचं सांगण्यात येतं. बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील स्वेच्छा निवृत्तीमुळे क्रमश: ६ हजार ३६५ कोटी आणि २ हजार १२० कोटींची बचत होणार आहे. विशेष म्हणजे ही स्वच्छा निवृत्ती योजना गुजरात मॉडेलच्याधर्तीवर बनिवण्यात आली आहे. गुजरातमध्ये कर्मचाऱ्यांना पूर्ण करण्यात आलेल्या प्रत्येक सेवा वर्षासाठी ३५ दिवसाचं वेतन तसेच निवृत्तीपर्यंत राहिलेल्या वर्षांसाठी २५ दिवसाचं वेतन देण्यात आलं आहे.  सध्या बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय ६० वर्ष आहे. त्यात दोन वर्षाची कपात करून ते ५८ एवढं करण्यात येणार आहे. व्हीआरएस आणि निवृत्ती वयातील कपातीमुळे बीएसएनएलमधील एकूण ५४ हजार ४५१ कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार असल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं.   Print


News - World | Posted : 2019-04-04


Related Photos