या वर्षीही पाऊस कमीच , ‘स्कायमेट’ चा अंदाज


वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्र  दुष्काळाने होरपळत असताना या वर्षीही कमी पाऊस पडण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत महाराष्ट्रासह देशभरात सामान्यपेक्षा कमी म्हणजे सरासरीच्या केवळ ९३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही ‘बॅड न्यूज’ आहे. कमी पावसामुळे शेती पुन्हा संकटात सापडणार आहे. दरम्यान, कमी पावसामागे ‘अल-निनो’चा प्रभाव असल्याचे हवामानतज्ञांचे म्हणणे आहे.
‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार सरासरी ९३ टक्के पाऊस पडणार आहे. सरासरी ९० ते ९५ टक्के पाऊस हा  सामान्यपेक्षाही कमी श्रेणीमध्ये येतो. देशात जून ते सप्टेंबर या काळात मान्सूनचा सरासरी २८९ मि.मी. पाऊस होतो, मात्र यंदा फक्त २६३ मि.मी. पाऊस होईल अशी भीती व्यक्त होत आहे.
 सामान्य पेक्षा कमी पाऊस पडण्यामागे ‘अल-निनो’चा प्रभाव हे कारण असणार आहे असे स्कायमेटचे सीईओ जतीन सिंह यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजात ‘अल-निनो’बाबत भाष्य केले नव्हते. दरम्यान, केंद्र सरकारचा हवामान  विभागाचा अंदाज अद्याप आलेला नाही.
सध्या संपूर्ण मराठवाडा, विदर्भासह राज्यातील १५१ तालुक्यांना दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेक तालुक्यांमध्ये तीक्र पाणीटंचाई आहे. रब्बीचे पीकही घेता आलेले नाही. त्यामुळे जून ते सप्टेंबर २०१९ मध्ये वरुणराजाची चांगली कृपा होईल, पाऊस चांगला बरसेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे, परंतु स्कायमेटचा अंदाज खरा ठरला तर मोठे संकट ओढवेल. सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागण्याची भीती आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-04-04


Related Photos