महत्वाच्या बातम्या

 लवकरच महाविद्यालयांमध्ये मतदार नावनोंदणी शिबिरांचे आयोजन


- जिल्हाधिका-यांनी घेतला मिशन युवा इन अभियानाचा आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील किमान ७५ हजार नवमतदारांच्या नोंदणीसाठी मिशन युवा-इन हे अभियान राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा आढावा आज जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी घेतला. अधिकाधिक युवांची मतदार म्हणून नावनोंदणी होणे गरजेचे असून यासाठी लवकरच महाविद्यालयीन स्तरावर मतदार नावनोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

मिशन युवा इन या अभियानाचे उद्घाटन १५ जुलै रोजी मानकापूर येथील  विभागीय  क्रीडा संकुलात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर या अभियानाचा आढावा जिल्हाधिका-यांनी घेतला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले यांच्यासह शहरातील सर्व तहसीलदार प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व तहसिलदार, उपविभागीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मिशन युवा इन हे अभियान व मतदार म्हणून नावनोंदणीसाठी आवश्यक कार्यपद्धतीची माहिती व्हावी यासाठी गुरुवार २० जुलै रोजी महाविद्यालयाच्या प्राचार्य, वर्गनिहाय शिक्षक व युवा ॲम्बिसिडरची कार्यशाळा डॅा. वसंतराव देशपांडे सभागृहात घेण्यात येणार आहे. यात मतदार नोंदणी कशी करावी, आवश्यक कागदपत्रे, महाविद्यालयाची या अभियानातील भूमिका याविषयीची माहिती देण्यात येणार आहे. लवकरच शहर व ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये मतदार नावनोंदणीची शिबिरे आयोजित करण्यात यावीत, असे निर्देशही जिल्हाधिका-यांनी या आढावा बैठकीदरम्यान दिले.    

मिशन युवा इन हा महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्याने अभिनव प्रयोग केला आहे. कालमर्यादेत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ठरवले आहे. येत्या तीन महिन्यात जिल्ह्यातील किमान ७५ हजार मतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात १८ आणि १९ वर्षे वयोगटातील नावनोंदणीचे प्रमाण अत्यल्प आहे. यासाठी महाविद्यालयीन स्तरावर युवा ॲम्बिसिडर म्हणून नियुक्ती केली जाणार असून यासाठी महाविद्यालयांचे सहकार्य घेतले जाईल.





  Print






News - Nagpur




Related Photos