महत्वाच्या बातम्या

 विटाळाचे जोखड-एक अंधश्रद्धा...!


तंत्र नार्यस्तू पूजन्ते रमन्ते तंत्र देवता ||

यंत्रे वास्तू पूजन्ते सर्वस्तात्रापला ||

जिथे स्त्रीचा आदर होतो तेथे देवतांना आनंद वाटतो आणि तिथे स्त्रियांचा मान राहत नाही तेथील सर्व क्रिया निष्फळ होतात. ज्या प्रमाणे अंधार घालविण्यासाठी ज्योतीच्या प्रकाशाची गरज असते. त्याचप्रमाणे विश्व कल्याणासाठी प्राचीन तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून त्या मागची कारणे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मासिक पाळी बद्दल आजच्या समाजात कीती गैरसमज आहे. त्याबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धा विरूद्ध प्रबोधन होणे आज काळाची गरज वाटते. महिलांना परंपरेच्या नावाखाली चालणाऱ्या अंधश्रद्धेवर इतका विश्वास बसला आहे की, आपल्यावर अन्याय होत आहे यांची जाणिव होत नाही खरे तर अंधश्रद्धा निर्माण कशी झाली आणि त्या भारताची परंपरा म्हणून कोणी मांडले यांचे उत्तर त्यांना विचारले तर तेही त्यांना सांगता येणार नाही. मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे स्त्रीला मातृत्वाचा अनुभव घेता येतो मात्र याबाबत पुर्वीपासून अनेक गैरसमज समाजात आहेत. 

लेखक शिवाजी सावंत यांचे एक वाक्य आठवते की, पराक्रमाचे मातृत्व पुरुषाकडे असते. पण मातृत्वाचा पराक्रम केवळ स्त्रीच करु जाणते. जागतिक आरोग्य संघटनेने तर २८ मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून जाहीर केला आहे. मासिक पाळी बाबत सामाजिक गैरसमज दूर करून महिलांचे खच्चीकरण थांबले पाहिजे. यासाठी अनेक सामाजिक संस्था, शासनाच्या वतीने विविध  उपक्रम राबविले जातात तरी देखील काही ठिकाणी दुर्गम ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मासिक पाळी या विषयाकडे अंधश्रद्धेच्या नजरेतून पाहिल्या जाते. 

मासिक पाळी बाबतचे समाजातील गैरसमज दूर होणे गरजेचे आहे असे मत स्त्रीरोग तज्ज्ञांनी व्यक्त केलेले आहेत. कुठल्याही स्त्रीची हाच मातृत्वाचा पराक्रम गाजवण्याची सुरुवात एका सुंदर प्रक्रियेतून होते ती प्रक्रिया म्हणजेच तिला येणारी मासिक पाळी. काही ठिकाणी त्या पाळी आलेल्या मुलीला कावळा शिवला आहे म्हणून चार-पाच दिवस बाहेर बस असे काही तरी सांगितले जाते. मग ती मुलगी कधी कावळा शिवला याचाच विचार करत राहते. तिला स्वयंपाक घराच्या बाहेर बसविले जाते. तिचे ताटवाटी, अंथरून ,पांघरूण वेगळे दिले जाते, या देवघरात, स्वयंपाक खोलीत, लोणचे, पापड मसाले ठेवलेल्या ठिकाणी तीला हात लावू दिल्या जात नाही. आम्हाला हा विटाळ चालत नाही. पाप लागेल असे त्यांचे बोलणे वारंवार महिलांना ऐकून घ्यावे लागते आणि ते तीन चार दिवस स्वयंपाक घरात प्रवेश न करता बाहेर ठेवलेले ताट लांबूनच सरकवले जाते. पाण्याच्या ग्लासात वरूनच पाणी ओतले जाते म्हणजे एक प्रकारचे अस्पृश्यता दिसून येते. अशी ही मासिक पाळी विषयची अंधश्रद्धा आजही खेळे गावात व अशिक्षित कुटुंबात दिसून येते. मला कधी कधी असा प्रश्न पडतो की, ज्याच्या घरी करणारे दुसरे कोणीही नाही त्या महिलांना सर्व कामे करावी लागते. शेतात, घरात, नोकरीवर सर्व ठिकाणी सर्व क्षेत्रात वावरावे लागते. काही महिला शेतात मोलमजुरी, मेहनतीचे कामे करतात. शेतातील काम करायला जी बाई जाते तिची पाळी येते आणि ती बाई फुले तोडणे, भाजी काढणे, कापूस तोडणे, विळ्याची पाने तोडणे, असे कामे करणारी पाळी आलेल्या दिवसात ही कामे करत असते. मग हे जेव्हा त्या बाईने शेतातून काढलेले असते हेच बाजारात आणून विकले जाते तेव्हा विटाळाचा विचार केला जात नाही. मग त्या वेळेला कुठे जातो आपला विटाळ मणनारा अंधश्रद्धाळू समाज. अंधश्रद्धेच्या विरोधात प्रबोधन करणे महत्त्वाचे आहे. 

आजच्या २१ व्या शतकातही मासिक पाळी आलेल्या स्त्रीला मंदिरात प्रवेश नाकारला जातो. पुजेला हात लावू दिल्या जात नाही. मंत्रपाठ बोलायचे नाही, देवाचे नामस्मरण करायचे नाही, देवीचा अवतार समजला जाणारी स्त्री देवळात पाळी आल्यानंतर जाऊ शकत नाही. का तर तीला विटाळ आहे. पण प्रजनन क्षमता केवळ स्त्रीयांमध्येच आहे . ही पुरुष मंडळी  करु शकत नाही. मानव निर्मितीची प्रक्रिया ही तिच्या मुळे होत असेल तर मासिक पाळी येणे म्हणजे काय ? हे समजून घेतले पाहिजे. खरे तर मासिक पाळी येणे हे स्त्री धर्माला मिळालेला वरदान आहे. मासिक पाळी दरम्यान आंबट, खारट खाल्यामुळे हार्मोन्सपर परीणाम होते म्हणून ते पदार्थ खाले जाऊ नये या शास्त्रीय कारणांमुळे त्यापासून स्त्रियांना लांब ठेवले जावे. असे असताना आपला अंधश्रद्धा समाजात पाळी असलेल्या बाईने शिवले तर विटाळ होतात असा गैरसमज आजही ग्रामीण भागात दिसून येतो. स्त्री पुनर्जीवनाचा स्त्रोत आहे. स्त्रीच पृथ्वीतलावरील मानववंशाची वेल आहे. परंतु ज्याच्या आधारे नवीन जीवनास या जगात सुरवात होते. त्या मासिक पाळीलाच अपवित्र समजणाचे अमानवी कृत्य माणूस करीत आला आहे. मातृत्वाचे वरदान निसर्गाने स्त्रीला बहाल केले नसते तर सृष्टीच्या निर्मितीचे कामच थांबले असते. मातृत्वाचे वरदान मिळाले ते या मासिक पाळी मधूनच. त्यांच्याच नशिबी आईचे सुख असते. सृष्टचे निर्माण करणाऱ्या पाळीचा खरोखर उत्सव साजरा करायला हवा. यापुढे कुठलेही दुमत न ठेवता सृष्टी कडून स्त्री जातीला मिळालेल्या या नैसर्गिक प्रक्रियेचा निसंकोचपणे स्वीकार करू यात.अंधश्रध्दा विचारांचा शृंखला तोडू यात. मासिक पाळी या सुंदर नैसर्गिक प्रक्रियेचा स्वीकार करु यात. अशा चुकींच्या अंधश्रद्धांच्या विरूध्द आवाज उठविणारे एक थोर समाजसुधारक बसवेश्वर हे बाराव्या शतकात होऊन गेले. त्यांनी वीरशैव नावाचा ग्रंथ लिहिला. व त्यातून मासिक पाळीच्या काळातही स्त्रीयांना देवपूजेचे अधिकार दिले. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा लीळाचरित्र या ग्रंथात मासिक धर्माविषयी जागृती निर्माण केली आहे. भारतीय संस्कृतीत बाराव्या शतकातही मासिक पाळीच्या अंधश्रद्धे विरूध्द समाजसुधारक आपल्या देशात होते. 

आजच्या मासिक पाळीमुळे उद्याची खंबीर आत्मविश्वास असलेली महिला आणि भावी आदर्श नागरीकांची माता होणार असते तेव्हा स्त्रीला व तीच्या मासिक पाळी लाही अपवित्र समजू नये. या सर्व बाबींचा विचार करून स्त्रीयांनी गप्प राहून चुकीच्या परंपरा जोपासत बसण्यापेक्षा जुन्या अंधश्रद्धांच्या रुढी परंपरा यांना बळी पडू नये. मासिक पाळी ला न नाकारता कींवा अंधश्रद्धेचा जोखड न मानता आनंदाने स्वीकारावे. समाजात या विषयी श्रध्दा आणि अंधश्रद्धा खुप निर्माण झाल्या आहेत. कुठेतरी विज्ञानावर आधारित काळानुसार समाजाला बदलण्याची गरज आहे. यासाठी खऱ्या अर्थाने माता पालकांनी मासिक पाळी स्वच्छता आणि व्यवस्थापन या विषयावर मुलींना वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे. सुनिता विल्यम सारखे शास्त्रज्ञ त्या चंद्रावर सहा महिने अभ्यास करते त्या वेळी मासिक पाळी असताना देखील ती चंद्रावर काम करू शकते तर मग आपण का करू शकत नाही? भारतात अनेक ठिकाणी मंत्रालय, कार्यालय, शाळा, काॅलेज, विमानसेवा, रेल्वेसेवा, अंतराळात, मोठ्या आस्थापनेच्या ठिकाणी काम करणाऱ्या स्त्रीया पाळीमुळे विटाळ आला आहे असे सांगत नाही. किंवा रजा घेत नाही असा वेळी पाळी आली म्हणून कोणतीही ती सेवा नाकारली जात नाही. मासिक पाळी येणे हा स्त्रीच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्या विटाळाचा प्रश्नच येत नाही. या संदर्भात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी, स्वयंसेवी संस्थांनी, शाळा, काॅलेज यांनी पुढाकार घेऊन शहर व गावातील मुलींना पाळी हा विटाळ नाही असे शिक्षण द्यावे आणि त्यांची स्व क्षमता वाढवावी. स्त्री आणि पुरुषाला जन्माला घालताना परमेश्वराने मासिक पाळी हे जोखड ठेवलेले नाही ते अंधश्रद्धाळू समाजाने निर्माण केलेले एक जोखड आहे. आजच्या युगात आपण हे जोखड फेकून दिले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा विचार केला पाहिजे. अंधश्रद्धेने बुरसटलेल्या विचाराना आळा घालणे महत्त्वाचे आहे. 

संकलक : श्री. सुरेश चुधरी, गडचिरोली 

संपर्क - ९४२१७३५६९१





  Print






News - Editorial




Related Photos