नागपूर रेल्वे स्थानकावर उमा भारती थोडक्यात बचावल्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी उमा भारती मंगळवारी रेल्वेने नागपूर दौऱ्यावर आल्या.  त्या  रेल्वे स्थानकावरील बंद एस्केलेटरवरून जात असताना अचानक ते सुरू झाल्यामुळे उमा भारती  थोडक्यात बचावल्या. दरम्यान या प्रकाराची तक्रार भारती यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. 
 रेल्वेतून उतरल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून त्यांना एफओबीकडे जायचे होते. त्यामुळे त्या प्लॅटफॉर्म २ वरील एस्केलेटरजवळ गेल्या. त्या तेथे पोहचल्या, त्यावेळी ते बंद होते. त्यामुळे बंद एस्केलेटरवरून त्या चढायला लागल्या. मात्र, अचानक एस्केलेटर सुरू झाल्याने धक्का बसून त्यांचा तोल गेला. मात्र, तशाही स्थितीत त्यांनी स्वत:ला सावरले व पुढील अनर्थ टळला. रेल्वे प्रशासनाच्या या निष्काळजीपणाबद्दल भारती यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत स्टेशन व्यवस्थापक कार्यालय गाठले व या प्रकाराची लेखी तक्रार केली. 
दरम्यान, बंद एस्केलेटर अचानक कसे सुरू झाले, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी एस्केलेटरसाठी एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ज्यावेळी उमा भारती आल्या त्यावेळी ही महिला कर्मचारी तेथे हजर नव्हती. ही महिला कर्मचारी बाहेर जाताना तिने एस्केलेटरची किल्ली बाजूच्या पुस्तकविक्रेत्याकडे ठेवली होती. त्याला उमा भारती एस्केलेटरवर चढत असल्याचे दिसताच त्याने धावत जाऊन किल्ली लावली व एस्कलेटर सुरू केले आणि हा प्रकार घडला. सुदैवाने भारती यांनी स्वत:ला सावरले.    Print


News - Nagpur | Posted : 2019-04-03


Related Photos