कोरची तालुक्यातील कोचिनारा परिसरात नागरीकांनी जाळले नक्षली बॅनर


- लोकशाहीला विरोध करणाऱ्या नक्षल्यांचा केला निषेध
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी काही ठिकाणी बॅनर लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरीकांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला आहे. नक्षल्यांनी लावलेले बॅनर नागरीकांनी जाळून निषेध केला आहे.
कोरची तालुक्यातील कोचिनारा - बुटेकसा मार्गावर नक्षल्यांनी लाल रंगाचे कापडी बॅनर बांधून लोकसभा व विधानसभा निवडणूकांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले. कोचिनारा, बुटेकसा, सातपुती या परिसरातील नागरीकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी एकत्र येवून नक्षल्यांच्या लोकशाही विरोधी कृत्याचा निषेध केला. बॅनर काढून जाळून टाकले. 
कोरची तालुक्यातील अनेक गावे नक्षलदृष्ट्या अत्यंत संवेदनशिल आहेत. नक्षली अनेक वर्षांपासून या भागात आदिवासी जनतेवर दहशत ठेवून वावरत आहेत. नक्षल्यांनी आतापर्यंत आदिवासी जनतेवर केवळ अन्याय केला आहे. अनेक निष्पापांचे बळी घेतले आहेत. आदिवासी युवक युवतींनी रोजगाराचे कोणतेही साधन नसताना , नक्षलवादी त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेवू देत नाहीत. नक्षली नेहमीच खोट्या क्रांतीची स्वप्ने दाखवून आदिवासी जनतेची दिशाभूल करतात, हे जनतेच्या लक्षात आले आहे. नक्षल्यांकडून होणाऱ्या अत्याचारांमुळे नक्षलवाद्यांचा खरा चेहरा पुढे आला आहे. नक्षलवाद्यांच्या लोकशाही विरोधी कृत्यांचा निषेध करीत नक्षली हिंसाचाराचा व त्यांच्या धोरणाचा निषेध करीत नक्षलवाद मुर्दाबाद च्व्या घोषणा नागरीकांनी दिल्या.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-02


Related Photos