आचारसंहितेचा धाक दाखवून सराफाला लुटले, चार पोलीस बडतर्फ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई
: आचारसंहितेचा धाक दाखवून उदगीर (लातूर) येथे सराफी व्यापाऱ्याची काल १.५ लाख रुपयांची लूट केल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार ४ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आले असून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे यांनी दिली.
उदगीर (लातूर) येथील सराफा व्यापारी सचिन बालाजी चन्नावार यांनी लातूरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. ते काल रात्री ६ लाख रुपयांच्या रोख रकमेसह घरी जात असताना त्यांना ४ पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवून पैशाबाबत चौकशी केली. त्यानंतर आचारसंहितेचा धाक दाखवून १.५ लाख रुपये काढून घेत उर्वरित रक्कम   चन्नावार यांना परत केली.
 चन्नावार यांच्या तक्रारीनुसार पोलीस शिपाई श्रीहरी राम डावरगवे, श्याम प्रभाकर बडे, महेश बापूराव खेळगे, रमेश पंढरीनाथ बिर्ले यांच्यावर भा.दं.वि. कलम ३९२ , ३८४ , ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या चौघांना अटक करण्यात आले असून लातूर पोलीस अधीक्षकांनी सेवेतून बडतर्फ केले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-04-02


Related Photos