अपात्र केलेल्या होमगार्ड सैनिकांना संघटनेत परत घ्या


- अन्यथा लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकणार
- जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्यातील होमगार्ड सैनिकांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाच्या अन्यायकारक अटींमुळे गडचिरोली जिल्ह्यातील अंदाजे २०० आणि संपूर्ण राज्यातील अंदाजे १४ हजार होमागर्ड सैनिक अपात्र करण्यात आले. याविरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने झाली. आंदोलनाची दखल घेवून शासनाने ८ मार्च २०१९ रोजी शासन निर्णय काढला. मात्र निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झाली नसून अपात्र केलेल्या होमागर्ड सैनिकांना संघटनेत परत घेण्यात यावे, अन्यथा लोकसभा निवडणूकवर बहिष्कार टाकू असा इशारा  जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. 
३ मार्च २०१९ रोजी शासनाने काढलेला शासन निर्णय विभागीय प्रमुख महादेशक यांच्या कार्यालयात येवूनसुध्दा होमगार्ड सैनिकांना पूर्ववत सेवेत सामावून घेण्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. राज्यातून विविध कारणांनी सेवासमाप्त व अपात्र केलेल्या होमगार्ड सैनिकांच्या सेवेचा सहानूभुतीपूर्वक विचार करून त्यांना संघटनेत सामावून घेण्यासाठी सशर्त संधी द्यावी, शारीरीक पात्रतेच्या कठोर असलेल्या अटी शिथील करण्यात येत आहे. जे होमगार्ड सैनिक पुनःनोंदणीच्या वेळी शारीरीक चाचणीमध्ये अपात्र ठरत असतील त्यांना एका महिन्याचे प्रशिक्षण देवून होमगार्ड संघटनेत पुन्हा सामावून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तरीही होमगार्ड संघटनेचे महादेशक यांनी अद्याप कोणतेही कार्यालयीन पत्र काढून कोणत्याही होमगार्ड सैनिकाला परत घेतलेले नाही. यामुळे राज्यातील होमगार्ड सैनिक, होमगार्ड परिवार व मित्रपरीवाराकडून लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-01


Related Photos