चांभार्डा ग्रामपंचायतीचा कारभार पाच दिवसांपासून बंद, नागरीकांना त्रास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अमिर्झा :
गडचिरोली तालुक्यातील चांभार्डा ग्रामपंचायतीचा कारभार मागील पाच दिवसांपासून बंद असून नागरीकांना विविध दाखल्यांपासून तसेच ग्रामपंचायत अंतर्गत विविध कामांपासून वंचित रहावे लागत आहे. 
चांभार्डा ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे सुरू असून पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचेही दूर्लक्ष आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी कधीच वेळेवर ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित होत नाहीत. अनेकदा गैरहजर असतात. आता पाच दिवसांपासून कारभारच बंद असल्यामुळे गावातील विविध समस्या सोडविणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावातील विहिरी कोरड्या पडत आहेत. अशातच नळयोजना दोन महिन्यांपासून बंद असल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत करून गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या मिटविण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा विक्की गेडाम, संतोष म्हशाखेत्री, विपुल म्हशाखेत्री, अक्षय म्हशाखेत्री, हिराजी ठाकरे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-01


Related Photos