आवडीच्या चॅनेल ची निवड न केलेल्या ग्राहकांना द्यावे लागणार अतिरिक्त पैसे?


वृत्तसंस्था / मुंबई :  आपल्या आवडीच्या वाहिन्या निवडण्याचा अधिकार ग्राहकांना देणारे टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे (ट्राय) धोरण देशभरात लागू करण्यात आले आहे. याबाबत आपल्या वाहिन्यांचा पसंतीक्रम सादर करण्याची शेवटची मुदत ३१ मार्च होती. मात्र ही मुदत रविवारी संपल्यानंतरही अद्याप ५० टक्के ग्राहक या नोंदणीपासून दूर आहेत. ज्या ग्राहकांनी नोंदणी केली नाही ते सध्या ज्या वाहिन्या पाहतात त्या सर्व वाहिन्या पाहिजे आहेत असे गृहित धरले जाऊ शकते. तसेच त्यानुसार पैसेही आकारले जाऊ शकतात. यामुळे आजपासून नोंदणी न केलेल्या ग्राहकांना केबलसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. 
आपल्या पसंतीची वाहिनी निवडून तेवढेच पैसे भरण्याची मुभा ‘ट्राय’च्या नव्या नियमांमुळे ग्राहकांना मिळाली होती. मात्र याच्या अंमलबजावणीतील गोंधळामुळे ३१ डिसेंबरपासून लागू होणारा हा नियम १ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आला. मात्र तरीही ग्राहक, केबलचालक, केबलसेवा पुरवठादार कंपन्या (एमएसओ), ब्रॉडकास्टर यांच्यातील गोंधळामुळे यशस्वी अंमलबजावणी होऊ शकली नाही. यातच एमएसओंनी ज्या ग्राहकांची नोंदणी झाली आहे त्यांचेच प्रक्षेपण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे काही भागात प्रक्षेपण बंद झाले होते. यानंतर मोठा गदारोळ झाला होता. परिणामी ‘ट्राय’ने मुदतवाढ देत ३१ मार्चपर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा दिली. असे असले तरी ग्राहकांमध्ये असलेला गोंधळ दूर न झाल्यामुळे सुमारे ५० टक्के ग्राहकांनी अद्याप आपल्या पसंतीच्या वाहिन्यांचे अर्ज सादर केलेले नाहीत. अशा ग्राहकांबाबत एमएसओ काय भूमिका घेतील हे आज समजू शकणार आहे. 

   Print


News - World | Posted : 2019-04-01


Related Photos