निवडणूकीच्या काळात अन्न व औषध , पोलिस प्रशासनाच्या धास्तीने सुगंधित तंबाखू तस्कर धास्तावले, गडचिरोलीत खर्रा ३० रूपये


- खर्रा शौकीन त्रस्त, अर्ध्याहून अधिक पानठेले बंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
निवडणूक व्यसनमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. यासाठी मुक्तीपथ संघटना, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस विभाग कसून कामाला लागला आहे. यामुळे सुगंधित तंबाखू तस्कर, अवैध दारू तस्कर धास्तावले असून दारू तसेच सुगंधित तंबाखूचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. यामुळे खर्रा शौकीनांना चांगलाच फटका बसत असून गडचिरोली शहरात २० रूपयांचा खर्रा घेण्यासाठी आता ३० रूपये मोजावे लागत आहेत. यामुळे खर्रा शौकीन त्रस्त झाले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. तसेच मुक्तीपथ संघटनेच्या माध्यमातून सुगंधित तंबाखू, खर्रा, गुटखा विक्रीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा वस्तूंवर महाराष्ट्रात बंदी आहे. मात्र जिल्ह्यात आजही या वस्तू खुलेआम मिळतात. लगतच्या छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची तस्करी केली जाते. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिस विभागाकडून प्रत्येक मार्गावर वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच मोठ्या दारू तस्करांवर, तंबाखू तस्करांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. यामुळे सुगंधित तंबाखूचा तुटवडा जाणवत असून गडचिरोली शहरातील अर्ध्याहून अधिक पानठेले बंद असल्याचे दिसून येत आहे. यामुळे खर्रा शौकीनांची चांगलीच पंचाईत झाली असून ‘भाऊ तू दे गा, भाऊ दे गा थोडा सा’ अशी म्हणण्याची पाळी आली आहे. खर्रा शौकीन आपल्या रोजच्या पानठेला चालकाकडे खर्ऱ्याची मागणी करीत आहेत. मात्र तंबाखूच नसल्याने पानठेले चालक सुध्दा खर्रा देण्यास नकार देत असल्याने खर्रा शौकीन भटकंती करताना दिसून येत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-31


Related Photos