राज्यात कमाल तापमानात वाढ, विदर्भात काही ठिकाणी पारा ४३ अंश सेल्सिअसच्याही पुढे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  राज्यात  कमाल तापमानात  वाढ होत असून  उन्हाचा चटका  सहन करावा लागत आहे.  विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले आहे. नागपूरमध्ये ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  याशिवाय पुणे, जळगाव, मालेगाव, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, बीड, ब्रद्मपुरी, गोंदिया, वाशिम, यवतमाळ आदी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांवर पोहोचला आहे. पुढील काही दिवस कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती राहणार असल्याने तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
  मध्य महाराष्ट्रातही उन्हाचा चटका अधिक आहे. कोकण विभागातील मुंबई, रत्नागिरी आदी ठिकाणी मात्र किमान तापमान सरासरीच्या तुलनेत कमी आहे. हवामानाच्या कोरडय़ा स्थितीमुळे तापमान कायम राहणार असून, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात गेल्या आठवडय़ापासून तापमानात झपाटय़ाने वाढ सुरू झाली आहे. सद्यस्थितीत जवळपास अठराहून अधिक शहरांमध्ये तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. मार्च महिन्यामध्ये यापूर्वी अगदी एखाद-दुसऱ्या वर्षीच तापमानाने चाळिशी पार केली होती. मात्र, या महिन्यात काही ठिकाणी सलग चार ते पाच दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ४० अंशांवर नोंदविला जात आहे. दुपारी उन्हाच्या चटक्यांनी अंग भाजून निघत असल्याची स्थिती आहे. कोकण विभाग वगळता इतर ठिकाणी कमाल तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत तब्बल ३ ते ५ अंशांनी वाढ झाली आहे. किमान तापमानाचा पाराही वर गेला असल्याने रात्री चांगलाच उकाडा जाणवत आहे.  शनिवारी राज्यात अकोला येथे ४३.६ अंश उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-31


Related Photos