प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या एका १६ वर्षीय मुलाची हत्या, प्रेत टाकले पाण्याच्या टाक्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर :
बहिणीसोबत असलेले प्रेमप्रकरण माहित झाल्याने आणि प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने   एका १६ वर्षीय मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह तिघांनी भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील पाण्याच्या टाक्यात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी  कोणताही धागादोरा सोडला नसताना नंदनवन पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून चिपडी (कुही) गावातील तिघांना अटक केली आहे.
 रोहित शांताराम रंगारी (१६) असे मृत मुलाचे नाव आहे.   शानू ईकबाल शेख ( २२), विक्की ऊर्फ विराज मधुकर पाटील ( १९) अशी आरोपींची नवे असून या घटनेत  यात आणखी एका अल्पवयीन गुन्हेगाराचाही समावेश आहे. मृत आणि आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत. पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी दिलेल्या माहितीनुसार  रोहितने नुकतीच दहावीची परिक्षा दिली होती. आरोपी शानूचे चपलेचे दुकान असून, दुसरा आरोपी विक्की कुलर दुरुस्तीचे काम करतो. रंगारीच्या बहिणीसोबत गावातीलच आरोपी शानू शेख याचे प्रेमसंबंध होते. ते माहीत पडल्याने रोहित शानूचा राग करायचा. त्याने बहिणीलाही दम दिला होता. शानूला भेटल्यास गंभीर परिणाम होतील,असे म्हटले होते. चिपडी छोटेसे गाव आहे. प्रेयसीचा भाऊ विरोधात गेल्याने शानूच्या प्रेमसंबंधात अडसर निर्माण झाला होता. त्यामुळे शानू संतप्त झाला. त्याने त्याचा मित्र विक्की पाटील आणि एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने रोहित रंगारीचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानुसार, आरोपी शानूने विक्कीच्या माध्यमातून रंगारीला नागपुरात पार्टी करू म्हणून हट्ट धरला. त्यानुसार, २२ मार्चला रात्री दुचाकीने विक्की व अन्य एका आरोपीसोबत रंगारी नागपुरात आला. शानूही मागून आला. हे सर्व मोमीनपुऱ्यात गेले. तेथे त्यांनी एका हॉटेलमध्ये जेवण घेतले.
जेवण घेतल्यानंतर  आरोपींनी रोहित रंगारीला विक्कीचा अंतुजीनगरातील चुलत भाऊ आशिष पाटील याच्या रूमवर नेले. तेथे आरोपींनी रोहित रंगारीला बेदम मारहाण केली. त्यानंतर वाठोड्याजवळच्या डम्पिंग यार्डमध्ये नेले. तेथे शानूने रंगारीच्या डोक्यावर जड वस्तूने हल्ला चढवून त्याला ठार मारले आणि त्याचा मृतदेह सीवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये फेकून आरोपी पळून गेले. २४ मार्चला रात्रीच्या वेळी तेथील कर्मचाऱ्यांना मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याने कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून नंदनवन पोलिसांना कळविले. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.
डॉक्टरांनी मृताच्या डोक्यावर जोरदार प्रहार झाल्याचा तसेच हा हत्येचा प्रकार असल्याचे नंदनवन पोलिसांना सांगितले. ठाणेदार चव्हाण यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस उपायुक्त रौशन यांना दिली. मृताची ओळख पटविणारे कोणतेही साधन नव्हते. त्यामुळे डीडीपी रौशन यांनी ठाणेदार चव्हाण. पोलीस निरीक्षक अरविंद भोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना  शहर तसेच जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची यादी मागवून घ्यायला सांगितली. पोलिसांना मिळालेल्या यादीत कुहीतून २२ मार्च २०१९ पासून बेपत्ता झालेल्या रोहित रंगारीचे वर्णन मिळते - जुळते वाटल्याने पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलवून घेतले. त्यांनी तो मृतदेह रोहित रंगारीचाच असल्याचे सांगितले.   Print


News - Nagpur | Posted : 2019-03-30


Related Photos