गडचिरोली न.प. अंतर्गत उद्या रविवारीही थकबाकीदारांना करता येणार कराचा भरणा


- नगर परिषदेचे करनिरीक्षक रविंद्र भंडारवार यांची माहिती
- दिवसभर सुरू राहणार जप्तीची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्थानिक नगर पालिकेच्या वतीने १०० टक्के करवसुलीसाठी जोरदार मोहिम हाती घेण्यात आली आहे. थकबाकीदारांना नोटीस बजावून वेळेत कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जात आहे. उद्या ३१ मार्च रोजी आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. तसेच निवडणूकीची कामे सुरू आहेत. यामुळे रविवार असतानाही नगर परिषदेच्या करविभागाचे काम सुरू राहणार असून थकबाकीदारांनी कराचा भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन करनिरीक्षक रविंद्र भंडारवार यांनी केले आहे.
गडचिरोली शहरात नगर परिषदेच्या वतीने जप्तीची कारवाईसुध्दा सुरू आहे. उद्या रविवारीसुध्दा ही मोहिम सुरूच राहणार आहे. थकबाकीदारांना सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत कराचा भरणा करता येणार आहे.
नगर परिषदेच्या वतीने आतापर्यंत शासकीय वसुलीशिवाय ८० टक्क्यांहून अधिक करवसुली करण्यात आली आहे. शासकीय वसूली आल्यास ९० टक्क्यांचा आकडा गाठू शकतो, अशी माहिती भंडारवार यांनी दिली आहे. 
कर विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसोबत मुख्याधिकारी स्वतः थकबाकीदारांना आणि शासकीय कार्यालयांना भेट देवून कराचा भरणा करण्याविषयी सांगितले आहे. उद्या ३१ मार्चच्या वसुलीनंतर नगर परिषदेच्या करवसुलीची एकंदरीत स्थिती स्पष्ट होणार आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-30


Related Photos