महाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ केरळला रवाना


- मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेल्वेला दाखविला हिरवा झेंडा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / मुंबई : केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नेत्रावती एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून कुर्ला टर्मिनल्स येथून आज रवाना केली.

क्रेडाई एमसीएचआय, जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, राजस्थानी वेलफेअर असोशिएशन आणि महाराष्ट्र स्टेट-को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर मुख्य सचिव मदत व पुनर्वसन  मेधा गाडगीळ, संचालक नियंत्रण कक्ष दौलत देसाई नियंत्रक शिधावाटप दिलीप शिंदे, उपनियंत्रक शिधावाटप मधुकर बोडके, चंद्रकांत थोरात, माजी अपर मुख्य सचिव शेहजाद हुसैन तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 पाटील म्हणाले, देशातून केरळमधील पुरग्रस्तांसाठी विविध स्तरांतून सहानुभूतीपूर्वक मदतीचे हात पुढे येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्यावतीने आपत्तीग्रस्त राज्यांना मदत करण्यास महाराष्ट्र राज्य आग्रही राहीले आहे. यापूर्वी पूरग्रस्तांसाठी शासनाच्यावतीने २० कोटी, एसटी महामंडळाकडून १० कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच विविध संस्थेच्या माध्यमातून मदतीचे हात पुढे येत आहेत. अनेक संस्थांनी मदत केली गेली आहे. केरळमधील पुर ओसरला असून तेथील पुरग्रस्तांना डाळ, तांदूळ, तृणधान्य, सुकामेवा, बिस्किट अशा विविध टीकणाऱ्या वस्तू पाठवित आहोत. काल सांगली जिल्ह्यांतून पूरग्रस्तांसाठी बिस्किट पाठविण्यात आले आहेत.

 मेधा गाडगीळ व दौलत देसाई हे  केरळमधील प्रशासनाच्या संपर्कात असून समन्वयक म्हणून तेथील जनतेच्या मागणीनुसार जे हवे आहे ते पाठविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.  Print


News - Rajy | Posted : 2018-08-28


Related Photos