विरोधी पक्षांची मागणी मान्य झाल्यास निवडणुकीचे निकाल ६ दिवस लांबणार


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  २१ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून एका मतदारसंघातील किमान ५० टक्के व्हीव्हीपॅट स्लीप जुळवून पाहण्याची मागणी केली होती. जर  विरोधी  पक्षांची  मागणी मान्य झाल्यास निवडणुकीचे निकाल येण्यास सुमारे ६ दिवस जास्त लागू शकतात, असा दावा निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात केला. यामुळे निवडणूक प्रक्रियेवर संशय राहणार नाही, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचार करण्यास सांगितले होते.
विरोधी पक्षांकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी याचिका दाखल केली होती. व्हीव्हीपॅट स्लीप पडताळून पाहिल्यास निकालाला केवळ तीन ते चार तास उशीर होईल. पण निवडणूक आयोगावरील विश्वास वाढेल, असे त्यांचे म्हणणे होते.
निवडणूक आयोगाने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, जर प्रत्येक संसदीय किंवा विधानसभा मतदारसंघातील ५० टक्के व्हीव्हीपॅट स्लीप्स जुळवल्या तर यामुळे मतमोजणीला उशीर होऊ शकतो. यामुळे सुमारे ६ दिवस जास्त लागू शकतात. अशावेळी लोकसभा निवडणूक निकालाची घोषणा २३ ऐवजी ६ दिवस उशिराने होईल.
सध्या यासाठी स्लीप्स जुळवून पाहण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उपलब्ध नाही. कारण व्हीव्हीपॅटमधून निघणाऱ्या स्लीपवर कोणताच बारकोड नाही. त्यामुळे निवडणुकीचे निकाल ३० किंवा ३१ मे आधी येऊ शकणार नाही. त्याचबरोबर या स्लीप मोजण्यासाठी मोठ्याप्रमाणावर कर्मचाऱ्यांची गरज भासेल. इतकेच नव्हे तर मतमोजणी करण्यासाठी मोठ्या जागेची गरज भासेल. अनेक राज्यांमध्ये आधीपासूनच जागेची कमतरता भासत आहे.
सध्या निवडणूक आयोग प्रत्येक मतदारसंघातील कोणतेही एक इव्हीएम निवडून त्याच्या स्लीप्स पडताळून पाहते. सध्या देशात एकूण १०.३५ लाख मतदान केंद्र आहेत. सरासरी एका मतदारसंघात २५० मतदान केंद्र आहेत. आयोगानुसार, एक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मतमोजणीला एक तास उशीर होतो. पण जर ५० टक्के पर्यंत हे प्रमाण वाढवले तर सरासरी ५.२ दिवस लागतील.  Print


News - World | Posted : 2019-03-30


Related Photos