वाहनांच्या 'थर्ड पार्टी इन्शुरन्स'च्या प्रीमियममध्ये कोणतीही वाढ होणार नाही


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  विमा नियामक 'इर्डा'ने दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या 'थर्ड पार्टी इन्शुरन्स'च्या प्रीमियममध्ये कोणतीही वाढ करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या १० वर्षांपासून साधारणत: एप्रिल महिन्याच्या आसपास वाहनांच्या 'थर्ड पार्टी इन्शुरन्स'च्या प्रीमियममध्ये १० ते ४० टक्क्यांची वाढ होत आहे. मात्र, गेल्या वर्षी दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या प्रीमियममध्ये १० ते २० टक्क्यांची घट झाली होती. 
थर्ड पार्टी विमा हा सर्व विमाधारकांसाठी सारखाच असतो. गाडीच्या विविध क्युबिक/इंजिन क्षमतेमधील सर्व विमा कंपन्यांना करण्यात आलेल्या दाव्यांच्या आकडेवारीनुसार 'इर्डा' विमा हप्त्याची रक्कम ठरवत असते. थर्ट पार्टी हप्त्यांच्या रकमेचे दरवर्षी मूल्यमापन करून ते ठरवण्याचे कामही 'इर्डा'तर्फे करण्यात येते. चालू आर्थिक वर्षात 'इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडिया' अर्थात 'इर्डा'ने विम्याच्या प्रीमियममध्ये कोणत्याही प्रकारचे बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. 'इर्डा'तर्फे थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दर निश्चित केले जातात. मात्र, वैयक्तिक अपघात विम्याच्या प्रीमियमचे दर निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपनीवर सोपवली जाते. यंदा प्रीमियमच्या दरात २० ते ३० टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, प्रीमियमचे दर 'जैसे थे'च राहिल्याने ग्राहकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 
७५ सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी वाहनांसाठी आता ४२७ रुपये प्रीमियम द्यावा लागणार आहे. याशिवाय, ७५ ते १५० सीसी क्षमतेच्या दुचाकी वाहनांसाठी ७२० रुपये प्रीमियम द्यावा लागणार आहे. उच्च क्षमतेच्या दुचाकी वाहनांसाठी ९८५ रुपयांचा प्रीमियम द्यावा लागणार आहे. 
छोट्या कारसाठी दरवर्षी १८५० रुपये प्रीमियम द्यावा लागणार आहे. एसयूव्हीसाठी ७,८९० रुपये तर ऑटो रिक्षा आणि ई-रिक्षासाठी अनुक्रमे २,५९५ रुपये आणि १६८५ रुपये प्रीमियम द्यावा लागणार आहे. छोट्या टॅक्सींसाठी ५,४३७ रुपये आणि मोठ्या व्यावसायिक वाहनांसाठी ७,१४७ रुपये विमा प्रीमियम द्यावा लागणार आहे. विमा हप्त्यात कितीही वाढ झाली तरी वाहनाचा विमा वेळेवर उतरवणे आवश्यक असते. यासाठी एप्रिल उजाडण्याची वाट बघू नये. एप्रिलनंतर वाढीव दराने विमा खरेदी करण्याची वेळ येऊ शकते. गाडीला अपघात झाल्यास अथवा ती चोरीला गेल्यास मोठा आर्थिक फटका बसतो. या स्थितीत विमा संरक्षण गाडीमालकाला तारून नेते.    Print


News - World | Posted : 2019-03-30


Related Photos