लोकसभा निवडणुकीच्या ३ दिवसाच्या कालावधीत देशी, विदेशी दारू अथवा ताडीसारखे मद्यसदृश्य पदार्थ विक्रीस बंदी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधीपासून ते मतदानाची वेळ संपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी देशी, विदेशी दारू अथवा ताडीसारखे मद्यसदृश्य पदार्थ यांची विक्री करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. १९५१च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १३५ (सी) नुसार ही मनाई करण्यात आली असून, संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी ते दिवस 'ड्राय डे' म्हणजेच 'कोरडा दिवस' म्हणून जाहीर करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहेत. 
निवडणुका खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक काळात मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येते. तसेच मतदानापूर्वीचे ४८ तास आणि मतमोजणीच्या दिवसाचे २४ तास मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने यांना हा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. 
मतदान व मतमोजणी या काळात तीन दिवस 'ड्राय डे' जाहीर करण्याची संबंधित कायद्यात तरतूद आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी ४८ मतदारसंघांमध्ये एकूण ४ टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. ११ एप्रिल २०१९ रोजी ७ मतदारसंघासाठी, १८ एप्रिल रोजी १० मतदारसंघासाठी, २३ एप्रिल रोजी १४ मतदारसंघासाठी आणि २९ एप्रिल रोजी १७ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मतमोजणी २३ मे २०१९ रोजी होणार आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-30


Related Photos