चित्रपट 'जंगली' वास्तववादी कथा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई :
जंगल,, जंगली,,, वन्य प्राणी या विषयी सर्वाना आकर्षण असते ते टिकवले गेले पाहिजेत, वन्य प्राणी हे आपले मित्रच असतात, त्यांची एक भाषा असते त्यांना हि भावना असतात, ते सुद्धा माणसावर प्रेमच करतात. त्यासाठी त्यांचे संरक्षण केले पाहिजे, ह्या मध्यवर्ती कल्पनेवर “ जंगली “ चित्रपटाची निर्मिती जंगली पिक्चर्स या चित्रपट संस्थेतर्फे निर्माते विनीत जैन यांनी केली असून सहनिर्माती प्रीती शहानी या आहेत. कथा लेखन रोहन सिप्पी, चारुदत्त आचार्य, उमेश पाडळकर, रेतेश शहा यांनी केल असून पटकथा आदम प्रिन्स यांनी लिहिलेली आहे. दिग्दर्शन चक रसेल यांचे असून नयनरम्य छायाचित्रण मार्क इरवीन यांचे आहे. या मध्ये विद्युत जामवाल, पूजा सावंत, आशा भट, अतुल कुलकर्णी, मकरंद देशपांडे यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.
  या चित्रपटाचा मुख्य कथा विषय हा “ हत्ती “ आहे. ओरिसा मधील हत्तींच्या अभयारण्या वर केंद्रित करून संपूर्ण कथा बांधण्यात आली आहे. चंद्रिका अभयारण्यातील हत्तींच्या कळपावरून कथानकाला सुरवात होते. हत्तींच्या दातांना मागणी खूप आहे. त्यासाठी हत्तींची शिकार करावी लागते, हत्ती हा असा प्राणी आहे कि तो माणसावर प्रेम करतो, त्याला भावना असतात, दीदी नावाच्या हत्तीला महावती शंकरा हि सांभाळत असते. या अभयारण्यात अनेक हत्तींचा कळप मनमुरादपणे फिरत असतो, ह्या मध्ये “ भोला “ नावाचा एक अत्यंत सुंदर असा हत्ती असून त्याचे दात हे खूपच छान आणि आकर्षक दिसत असतात. त्याचे दात मिळविण्यासाठी केशव नावाचा शिकारी प्रयत्न करीत असतो, त्या दातांची विक्री त्याला करायची असते.
  चंद्रिका अभयारण्याचे व्यवस्थापक नायर हे असतात, त्यांचा मुलगा राज नायर हा पशुवैद्द असून तो मुंबईला दवाखाना चालवीत असतो, एक दिवस त्याची मुलाखत घेण्यासाठी मीरा नावाची पत्रकार त्याला भेटायला येते त्याचवेळी त्याला वडिलांचे बोलावणे येते आणि तो त्यांना भेटण्यासाठी चंद्रिका अभयारण्यात जायला निघतो. त्या ठिकाणी मीरा हि सुद्धा येते त्यावेळी ती व्यवस्थापक नायर यांची मुलाखत घेण्यास सुरवात करते, आणि इकडे जंगलात हत्तींच्या वरती शिकारी केशव हल्ला करतो. केशव ला त्याने योजलेली शिकार करता येते का ? भोला हत्ती चे पुढे काय होते ? राज नायर ह्याचे पुढे काय होते ? चंद्रिका अभयारण्याचे नायर यांची मुलाखत पूर्ण होते का ? दीदी हत्ती चे पुढे काय ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळतील. अभयारण्यातील हत्तींच्या भावना सुद्धा आपल्या मनाला स्पर्श करून जातात.
 राज नायर ची भूमिका विद्युत जामवाल यांनी दमदारपणे साकारलेली आहे. त्याचा अभिनय आणि फाईटिंग चे सीन लक्षात राहतात. महावती शंकरा ची भूमिका पूजा सावंत हिने सहजतेने केली आहे. शिकारी केशव ची भूमिका अतुल कुलकर्णी, पत्रकार मीरा ची भूमिका आशा भट, गजगुरू ची भूमिका मकरंद देशपांडे यांनी केली असून त्या सर्वांनी भूमिकेला न्याय दिलेला आहे. जंगली हा एक वास्तववादी सिनेमा असून चित्रपट गतिमान ठेवण्यात दिग्दर्शक चेक रसेल हे यशस्वी झाले आहेत. दिग्दर्शकांच्या बरोबर छायाचित्रण अत्यंत मनोहर केले असून त्याची जबाबदारी छायाचित्रकार मार्क इरवीन यांनी समर्थपणे सांभाळलेली आहे. सर्वच तांत्रिक बाजू छान जमून आल्या आहेत. प्राणी आणि माणुस यांच्या नातेसंबंधावर सिनेमा भाष्य करतो. हत्ती हे वाचवले पाहिजेत त्यांची शिकार करू नका असा संदेश हा सिनेमा देतो. एक सुरेख, निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि वास्तववादी असा सिनेमा अवश्य पहावा.  Print


News - Rajy | Posted : 2019-03-30


Related Photos