अबब! दारुतस्करांनी आखली दारूच्या शेततळ्याची योजना , राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकालाही बसला धक्का


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
दारू तस्कर विविध प्रकारचे उपद्व्याप करून अवैद्य दारूचा धंदा करीत आहेत. आता  अवैध गुळाची तस्करी उघड करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला एक नवीन  'योजना' पाहून धक्काच बसला  आहे.  दारू तस्करांनी चक्क दारूतळे निर्माण केले. सदरजवळच्या भिवसनखोरी परिसरात गुरुवारी हा  प्रकार उघडकीस आला.
निवडणुकीच्या काळात हातभट्टीची दारू बनविण्यासाठी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात बेकायदेशीर मार्गे येणाऱ्या काळ्या गुळाची तस्करी सुरूच असून पुन्हा अडीच टन काळा गूळ वाहनासह जप्त करण्यात आला. गेल्या चार दिवसांतील ही दुसरी कारवाई असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तस्करांच्या टोळीला जेरबंद करण्यासाठी कंबर कसली आहे. 
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सावनेर तालुक्यातील सिलोंजी चेक पोस्ट येथे रात्री अडीचच्या सुमारास ही कारवाई केली. छोट्या टेम्पोमध्ये १२ किलोच्या २२० ढेपा असल्याचे आढळून आले. वाहनासह ३ लाख ५८ हजारांचा माल जप्त करण्यात आला. 
मध्य प्रदेशातून येणारा माल सदरजवळील भिवसनखोरी परिसरात हातभट्टी दारूनिर्मितीसाठी आणण्यात येत होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने खुंटाला तलावाजवळ असलेल्या या परिसराला भेट दिली असता चक्क दारूचे शेततळेच तयार करण्यात आले असल्याचे आढळून आले. या मद्याच्या तळ्यात अवैध दारूसाठीचे रसायन टाकण्यात आले असल्याचे दुय्यम निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी सांगितले.   Print


News - Nagpur | Posted : 2019-03-29


Related Photos