चार वर्षाच्या मुलासमोर आई-वडिलांनी केली आत्महत्या


वृत्तसंस्था / मुंबई :  चार वर्षाच्या मुलासमोर आई-वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सायनमध्ये उघडकीस आली आहे. विवेक कांबळे (३०) आणि तारिका कांबळे (२६) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. आजारपणाला कंटाळून त्यांनी स्वतःला संपविल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. 
सायन पूर्वेकडील पीव्हीआर सिनेमागृहाजवळ असलेल्या महापालिका कॉलनीमध्ये विवेक हा पत्नी तारिका, भाऊ राजेश आणि चार वर्षाचा मुलगा आर्यन याच्यासोबत राहत होता. राजेश हा डीजेचे काम करत असल्याने मंगळवारी रात्री घराबाहेर होता. बुधवारी सकाळी घरी आल्यावर त्याने दरवाजा ठोठावला. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आर्यनच्या रडण्याचा आवाज येत होता. राजेश याने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यावेळी तारिका खाली पडलेली होती आणि तिच्या तोंडातून फेस येत असल्याचे आढळले. तर विवेक पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. प्राथमिक तपासामध्ये तारिका हिने विष घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विवेक आणि तारिका गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्या तणावातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-03-29


Related Photos