नाटक 'चल तुझी सीट पक्की' एक निखळ मनोरंजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई : 
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुखदुखाच्या घटना घडत असतातच, त्याच प्रमाणे अनेक चढ-उतार होणाऱ्या प्रसंगांना त्याला सामोरे जावे लागते. अर्थात हि त्याच्या कर्माची फळे असतात, आणि त्यासाठी त्या व्यक्तीचा नाईलाज असतो. तसेच जन्माला आलेला माणुस हा एक दिवस जाणार आणि त्याचे जीवन संपणार हे कालचक्र आहे. त्याच वेळी नियतीने आखलेल्या योजने मध्ये जर बदल झाला तर काय होईल ? ह्याची कल्पनाच केलेली बरी, त्यामुळे अनेक गमतीचे प्रसंग - घटना निर्माण होतील त्यामध्ये आणखीन घोटाळा झाला कि सारे काही चमत्कारिक होणार, अश्याच एका धमाल कल्पनेवर “ चल तुझी सीट पक्की “ या नाटकाची निर्मिती रचना पेंढारकर-सामंत आणि नाटक मंडळी या नाट्य संस्थेने केली आहे. निर्मिती लीना भागवत यांनी असून नाटकाचे लेखन नितीन दिक्षित यांचे आहे, दिग्दर्शन ओंकार राऊत यांनी केल आहे. नेपथ्याची बाजू प्रदीप मुळ्ये, संगीत विजय गवंडे, प्रकाश योजना भूषण देसाई यांनी सांभाळलेली असून या मध्ये मंगेश कदम, किरण माने, लीना भागवत, ओंकार राऊत, अनिषा सबनीस, जयंत घाटे या कलाकारांनी आपल्या भूमिका समरसतेने सादर केल्या आहेत.
   वसंत इनामदार, उमा इनामदार आणि त्यांची वरुण आणि पूर्वा हि दोन मुले, असे त्यांचे चौकोनी कुटुंब असते. वसंत इनामदार यांनी आपली संपत्ती पैसा, बंगला हे सारे अनेक घोटाळे आणि भ्रष्ट्राचार करून मिळवलेली असते. त्यांची बायको उमा हि एक महत्वाकांक्षी बाई असते, तिला सुखामध्ये राहायचे असते, त्यामुळे लग्नानंतर एका लहानश्या खोलीतून मोठया बंगल्यामध्ये हे सारे रहात असतात. मुलगा वरुण ह्याला चैनीची आवड, बापाच्या पैश्यावर मजा करणे हे त्याचे काम, मुलगी पूर्वा हि अगदीच साधी भोळी मुलगी, एक दिवस विचित्र घटना घडते, वसंता हा बंगलोर हून घरी येत असतांना त्याला सतत भास होतात कि आपला कोणीतरी पाठलाग करतोय, ती व्यक्ती त्याचा पाठलाग घरापर्यंत करीत येते. वसंता घरी घाबरत-घाबरत शिरतो, मुलांना आणि बायकोला सांगतो कि माझ्या मागावर कोणीतरी अज्ञात व्यक्ती पाळत ठेऊन आहे. खिडकीतून ती व्यक्ती बायको, मुलांना दाखवतो पण उमा, वरुण, आणि पूर्वा ह्यांना कोणीच दिसत नाही. उमा आणि वरुण ह्यांना पार्टी ला जायचे असते, त्यामुळे हा येणारा अडथळा त्यांना नको असतो. आणि त्याच वेळी ती व्यक्ती त्यांच्या घरात प्रवेश करते.
 वसंत आणि ती व्यक्ती मध्ये बोलणे सुरु होते ती व्यक्ती आपण यमदूत आहोत अशी ओळख करून देते, गंमत म्हणजे तो यमदूत फक्त वसंतालाच दिसत असतो, त्यामुळे घरचे वसंत ला वेडा ठरवितात, वसंत त्या यमदुता वर विश्वास ठेवत नाही पण नंतर त्यांनी केलेल्या चमत्कारांनी त्याला विश्वास ठेवावा लागतो, आता यमदूत याला बघण्याची उत्सुकुता उमा, वरुण, आणि पूर्वा ह्यांना लागलेली असते, यमदूत यांनी आमच्या समोर प्रकट व्हावे असे ते सुचवतात, यमदूत प्रकट व्हायला  तयार होतो पण त्याची एक अट असते कि, मी प्रकट झालो तर तुमच्या पैकी कोणीतरी एकाने मरायला तयार व्हायला पाहिजे. अर्थात त्याचा मृत्यू अटळ आहे.... हि त्याची अट सर्वजण मान्य करतात, आणि “ यमदूत “ प्रकट होतो. मृत्यू समोर दिसल्यावर सर्वांची बोबडीच वळते, आणि पुढे काय काय घडते हे सारे तुम्ही नाटकात अनुभवा, कारण त्यात खरी मजा आहे.
  वसंत, उमा, वरुण, पूर्वा ह्यांच्या पैकी कोणाची उचलबांगडी होणार ? ह्या मंडळीना आणखीन कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागणार ? त्यांच्या पैकी कोण कोणाला वाचवणार ? प्रत्येकालाच जगायचे आहे ? कोणाचा बळी जाणार ? अश्या अनेक नाट्यमय घटनांनी नाटकाची गती छान वाढली आहे. मृत्युच्या सामोरे कोण येणार ? कोण जाणार ? कोण मरणार ? कोण जगणार ? अश्या अनेक घटना विनोदी अंगाने फार्स च्या गतीने सर्वच कलाकारांनी दमदारपणे सादर केल्या आहेत. ह्या गमती जमती बघत असतांना आपल्याला एक संदेश सुद्धा नाटक देऊन गेले आहे. तो तुम्हीच अनुभवा.
    वसंत ची भूमिका मंगेश कदम यांनी अत्यंत बहारदारपणे सादर केली असून त्याची मानसिकता, भीती, प्रेम सारेच छान व्यक्त केले आहे. उमाची भूमिका लीना भागवत यांनी सहजतेने केली आहे. वरुण च्या भूमिकेला ओंकार राउत आणि पूर्वा च्या भूमिकेला अनिषा सबनीस ह्यांनी न्याय दिला आहे. आणि यमदूत ची खास भूमिका किरण माने यांनी अत्यंत खास शैलीत सादर केली असून ती भूमिका लक्षांत राहते. अण्णांच्या भूमिकेत जयंत घाटे हे चमकून जातात. दिग्दर्शक ओंकार राऊत यांनी नाटक गतिमान ठेवले असून त्यामधील प्रसंगामध्ये प्रेक्षक गुंतून जातो. चल तुझी सीट पक्की हे नाटक आजच्या वास्तव जीवनावर अर्थात,..  लोभीपणा, माणुसकी, एकमेकात असलेले प्रेम, राग, कावेबाजपणा यावर हे नाटक भाष्य करते. एकंदरीत एक धमाल नाटक पाहिल्याचे समाधान नक्की मिळेल.  Print


News - Rajy | Posted : 2019-03-29


Related Photos