चंद्रपूरमध्ये ४ उमेदवारांची माघार, १३ उमेदवारांमध्ये होणार लढत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
आगामी लोकसभा निवडणूक चंद्रपूर मतदारसंघात  ११ एप्रिलला होणार असून उमेदवारीसाठी दाखल झालेले अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रांतर्गत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी  ४ उमेदवारांनी माघार घेतली असून उर्वरित व अंतिम १३ उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आलेले आहे .   दरम्यान, निवडणूक निरीक्षक दीपांकर सिन्हा यांनी उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.   
  चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी दाखल अर्ज व छाननी करून एकूण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.  २८ मार्च दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ उमेदवारांंपैकी  ४ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता उर्वरित १३ उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.
 निवडणुकीसाठी १८ मार्च ते २५ मार्च या कालावधीत नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या मुदतीत १७ अर्ज दाखल झाले होते. यात विविध पक्ष व अपक्ष उमेदवार यांचा समावेश होता. २८ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अखेरची तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे  ॲड भूपेंद्र वामन रायपुरे, नवसमाज पार्टीचे विद्यासागर कालिदास कासर्लावार, अपक्ष अशोकराव तानबाजी घोडमारे व शैलेश भाऊराव जुमडे या चार उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. 
  काँग्रेस, भाजप, बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षांना त्यांच्या कायमस्वरूपी निवडणूक चिन्हांशिवाय इतरांना विविध निवडणूक चिन्हे दिली गेली आहेत. यात भाजपचे हंसराज अहीर यांना कमळ, कॉग्रेसचे सुरेश धानोरकर यांना हात, बहुजन समाज पार्टीचे सुशील वासनिक यांना हत्ती, बहुजन मुक्ती पार्टीचे डॉ गौतम गणपत नगराळे यांना चारपाई ( खाट ),बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दशरथ पांडुरंग मडावी यांना एअर कंडीशन, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नामदेव माणिकराव शेडमाके यांना करवत, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे नितेश आनंदराव डोंगरे यांना कोट, प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर विठ्ठल निस्ताने यांना गॅस सिलेंडर, वंचित बहुजन आघाडीचे ॲड राजेंद्र श्रीरामजी महाडोळे यांना कपबशी, अपक्ष उमेदवार अरविंद नानाजी राऊत यांना स्विच बोर्ड, नामदेव केशव किनाके यांना ऑटोरिक्षा, मिलिंद प्रल्हाद दहिवले यांना बॅट, राजेंद्र कृष्णराव हजारे यांना गन्ना किसान यांचा समावेश आहे. आता निवडणूक प्रचार जोर धरणार असून ९ एप्रिल प्रचाराची अंतिम तारीख आहे.  ११ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून २३ मे रोजी मतमोजणी होऊन २७ मे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख असणार आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-29


Related Photos