महत्वाच्या बातम्या

 पूरपरिस्थिती उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड


- विविध गावांची पाहणी : नागरिकांशी संवाद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : गतवर्षी भद्रावती व चंद्रपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये आलेल्या महाभयंकर पुरामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावर्षी हे नुकसान टाळण्यासाठी तसेच संभाव्य पूर परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ऑनफिल्ड जावून प्रत्यक्ष गावांना भेटी दिल्या व नागरिकांशी संवाद साधला.

जिल्हाधिकाऱ्यांनी आज ११ जुलै रोजी भद्रावती तालुक्यातील पळसगाव, माजरी, चारगाव, पिपरी व चंद्रपूर तालुक्यातील बेलसनी येथे भेट दिली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम., जिल्हा खनीकर्म अधिकारी सुरेश नैताम, वरोराच्या उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे, गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, वेकोली (माजरी क्षेत्राचे) चे महाव्यवस्थापक इलियाज हुसैन आदी उपस्थित होते.

पळसगाव येथे नागरिकांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, गतवर्षी या भागात आलेल्या भयंकर पुराची स्थिती टाळण्यासाठी यावर्षी आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. वेकोलीच्या ओव्हर बर्डनमुळे संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे शास्त्रीय नियमानुसार नदीच्या पात्रापासून ठराविक अंतरावर वेकोलीने डंपिंग करावे. तसेच नियमितपणे डंपिंग मोकळे करून नदीचा प्रवाह वाहता करणेसुध्दा आवश्यक आहे. पुराच्या पाण्यामुळे गावातील रस्ते सुस्थितीत करून अखंडीत वीज पुरवठा होण्यासाठी त्यांनी संबंधितांना सुचना दिल्या. गावात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरीत करावी. त्यासाठी वेकोलीने महिन्याअखेरपर्यंत आरओ लावावे. तसेच वेकोलीने सांडपाण्याबाबतचा अहवाल त्वरीत सादर करावा.

पूर परिस्थितीमध्ये नागरिकांना स्थलांतरीत करण्यासाठी गावात एक सुरक्षित निवारास्थान करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन किंवा खनीज विकासमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सदर निवारास्थान पुराच्यावेळी नागरिकांना स्थलांतरीत करण्यासाठी तर इतर वेळी सभागृह म्हणून उपयोगात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पीक विम्याची रक्कम त्वरीत मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना पाचारण करून त्वरीत नुकसान भरपाई देण्याचे निर्देश द्यावे. तसेच नागरिकांनी १ रुपयांत पीक विमा काढून घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

नागरिकांनी मांडल्या समस्या : वेकोलीच्या ओव्हर बर्डन मुळे नदी - नाल्यांचे पाणी गावात येत असून घर, शेती, अन्न, खते, घरातील इतर वस्तुंची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. यासाठी वेकोलीने वर्षभराची नुकसानभरपाई द्यावी. मात्र वेकोलीकडून तुटपुंजी मदत देण्यात येते. त्यानंतर वर्षभर आम्ही कसे जगायचे, असा सवाल गावकऱ्यांनी केला. गतवर्षीच्या पुरापासून गावातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. मात्र विद्युत महामंडळाचे अधिकारी किंवा लाईनमन येऊनही बघत नाही. वेकोलीच्या डंपिंगमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत एक धोरण तयार व्हावे, अशी मागणी नामदेव डाहुले यांनी केली.

पाहणीदरम्यान पळसगावचे सरंपच अंकुश मेश्राम, चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, बेलसनीच्या सरपंच इंदिरा पोले यांच्यासह पुरपिडीत गावांचे नागरीक उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos