विदर्भात मेंदूज्वरने काढले डोके वर ; एकाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
विभागातील सहा जिल्ह्य़ांमध्ये ‘स्वाईन फ्लू’वर नियंत्रण मिळवणे कठीण जात असतानाच आता जपानी मेंदूज्वरनेही डोके वर काढले आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१९ या दोन महिन्यात जपानी मेंदूज्वरच्या २२ रुग्णांची नोंद झाली असून मेडिकलमध्ये उपचारादरम्यान एक मुलगाही दगावला आहे. 
शुभम उमेश साहिल (१३) रा. सिलापूर, देवरी, गोंदिया असे मृत रुग्णाचे नाव आहे. नागपूर विभागात रानडुकरांची संख्या मोठी आहे. हा प्राणी जपानी मेंदूज्वरच्या विषाणूचा वाहक आहे. या डुकराला चावा घेतलेले डास मानवाला चावल्यास जपानी मेंदूज्वरची लागण होते. जानेवारी २०१९ पासून नागपूर विभागात या आजाराचे रुग्ण आढळणे सुरू झाले होते. हळूबळू फेब्रुवारीपर्यंत रुग्णसंख्या २२ वर पोहोचली आहे. त्यात गोंदियातील १३ जणांचा समावेश आहे. तेथील एका १३ वर्षीय मुलाचा फेब्रुवारीत या आजाराने मृत्यू झाला होता. आरोग्य उपसंचालक कार्यालयात मृत्यू अंकेक्षण समितीच्या बैठकीत हा मृत्यू जपानी मेंदूज्वरने झाल्यावर शिक्कामोर्तब झाले. या आजाराचे गडचिरोलीतही नऊ रुग्ण आढळले होते. दरम्यान, नागपूर विभागात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीतही जपानी मेंदूज्वराचे ५२ रुग्ण आढळले होते. यातील एकाचा मृत्यू झाला होता, परंतु यंदा दोन महिन्यातच रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागही हादरला आहे.

आजाराची लक्षणे

- ताप, अशक्तपणा

- तीव्र डोकेदुखी

-ओकारी होणे

- अर्धबेशुद्धावस्थेत जाणे

- झटके येणे  Print


News - Nagpur | Posted : 2019-03-28


Related Photos