गडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयाला रूग्णवाहिकांची कमतरता


- दोन रूग्णवाहिका प्राप्त मात्र हस्तांतरण नाही
- खासगी रूग्णवाहिकांचा घ्यावा लागतो आधार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात महिला, बालकांसाठी निर्माण करण्यात आलेल्या महिला व बाल रूग्णालयाला रूग्णवाहिकांची समस्या भेडसावत असून खासगी रूग्णवाहिकांचा आधार घेवून माता व बालकांना घरी पोहचवावे लागत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या रूग्णालयाला दोन रूग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हस्तांतरण झाले नसून या रूग्णवाहिकांचे हस्तांतरण निवडणूकीनंतरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपुऱ्या रूग्णवाहिकांमुळे मात्र गरोदर माता, बालकांना रूग्णालयातून ने - आण करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
गडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात जिल्ह्यासह लगतच्या चंद्रपूर , गोंदिया जिल्ह्यासह अन्य ठिकाणाहूनही गरोदर माता दाखल होतात. त्यांची प्रसुती झाल्यानंतर त्यांच्या घरापर्यंत मोफत पोहचवून देण्याची सरकारची योजना आहे. मात्र  अपुऱ्या रूग्णवाहीकांमुळे प्रसंगी रूग्णांच्या नातेवाईकांना स्वतःच्या खर्चाने घर गाठावे लागत आहे. विविध भागातून गरोदर माता दाखल होतात. प्रसुतीनंतर त्यांना पोहचवून देण्यासाठी महिला व बाल रूग्णालयात केवळ एकच रूग्णवाहिका आहे. यामुळे खासगी रूग्णवाहिका मागविल्या जातात. या रूग्णवाहिकांद्वारे रूग्णांना घरापर्यंत पोहचविले जाते. मात्र खासगी रूग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नाहीत. 
महिला व बाल रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. दीपचंद सोयाम यांनी दिलेल्या माहितीनुसार महिला व बाल रूग्णालयासाठी सहा रूग्णवाहिकांची मागणी केली होती. तसेच दोन १०८ टोल फ्री क्रमांकाच्या रूग्णवाहिका स्थायी देण्यात यावी अशी मागणी केली होती. सध्या चार रूग्णवाहिका जिल्हा सामान्य रूग्णालयास प्राप्त झाल्या आहेत. यापैकी दोन रूग्णवाहिका महिला व बाल रूग्णालयाला देणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सकांनी दिली. रूग्णवाहीकांची नोंदणी सुध्दा झाली आहे. मात्र अद्याप हस्तांतरण करण्यात आलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रूग्णवाहिका हस्तांतरीत केल्या जाणार असल्याची माहिती आहे. मात्र आचारसंहीतेमुळे रूग्णवाहिकांचे हस्तांतरण सध्या होणार की नाही, याबाबत शंका आहे. 
दररोज रूग्ण दाखल होतात. अनेक रूग्णांना रूग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर घरी पोहचवून देण्याची जबाबदारी आहे. मात्र रूग्णवाहिकांच्या कमतरतेमुळे वेळेवर पोहचविणे शक्य होत नाही. खासगी रूग्णवाहिका वेळेवर पोहचत नाहीत. १०८ टोल फ्री  क्रमांकाच्या रूग्णवाहिका केवळ अत्यावश्यक वेळीच सेवा देतात. यामुळे त्यासुध्दा वेळेवर येत नाहीत. यामुळे रूग्णांना ताटकळत रहावे लागते. तरीही वेळेवर रूग्णवाहिका पोहचवून रूग्णांना पोहचविण्यासाठी आपण कसोशिने प्रयत्न करीत असल्याची माहिती डाॅ. सोयाम यांनी दिली आहे. 
प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सरकारी वाहन देण्यात आले आहे. मात्र जिल्हा महिला व बाल रूग्णालयासाठी प्रशासकीय वाहन नाही. यामुळे शासकीय बैठका तसेच इतर ठिकाणी जायचे असल्यास स्वतःच्या वाहनाचा वापर करावा लागतो. नागपूर किंवा इतर ठिकाणी जायचे असल्यास बसचे तिकीट जोडावे लागते. यामुळे रूग्णवाहिका आणि एक शासकीय वाहन उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे डाॅ. सोयाम यांनी विदर्भ न्यूज एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-27


Related Photos