ताप किंवा व्हायरल फ्लूमुळे मृत्यू झाल्यास अपघात म्हणता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय


वृत्तसंस्था / नवी दिल्ली: मच्छर चावल्यानंतर मलेरियाने मृत्यू झाल्यास त्याला अपघात मानायचा का? जर तो अपघात समजला गेल्यास त्याला अपघात विम्याचा लाभ द्यायचा की नाही? असा पेचात टाकणारा खटला सर्वोच्च न्यायालयात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी दिलं आहे. ताप किंवा व्हायरल फ्लूमुळे मृत्यू झाल्यास त्याला अपघात म्हणता येणार नाही. मलेरिया अनपेक्षितपणे होतो. मच्छर चावल्याने मलेरिया होणं नैसर्गिक आहे, त्याला अपघात म्हणता येणार नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. 
राष्ट्रीय ग्राहक फोरमने मलेरियामुळे झालेल्या मृत्यूला अपघाताच्या श्रेणीत आणलं होतं. त्यानंतर विमा कंपनीला मलेरियामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचे आदेश दिले होते. विमा कंपन्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असता न्यायालयाने ग्राहक फोरमचा हा आदेश पलटला. देशात प्रत्येक तिसऱ्या व्यक्तिला मलेरिया होतो. म्हणून त्याला अपघात म्हणता येणार नाही, असं कोर्टानं म्हटलंय. न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिलाय. 
देवाशीष भट्टाचार्य नावाच्या एका व्यक्तिने सरकारी बँकेतून १६ जून २०११ रोजी गृह कर्ज घेतलं होतं. दर महिन्याला तो १९,१०५ रुपये हप्ता भरत होता. एकूण ११३ हप्ते त्याला भरायचे होते. त्यासाठी त्याने सुरक्षा विमाही उतरवला होता. भूकंप, आग आणि वैयक्तिक अपघातात झालेल्या मृत्यूबाबतचा हा विमा होता. तो आसाममध्ये नोकरीला होता. त्यानंतर मोझांबिकाला त्याची बदली झाली. तिथेच २२ जानेवारी २०१२ रोजी मच्छर चावून मलेरिया झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी ग्राहक फोरमकडे धाव घेऊन विमा मिळविण्याचा प्रयत्न केला होता.   Print


News - World | Posted : 2019-03-27


Related Photos