महत्वाच्या बातम्या

 घरबसल्या करा वारसाची नोंदणी : जाणून घ्या कशी असणार सुविधा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद, मयताचे नाव कमी करणे, बॅंकेचा कर्जाचा बोजा चढवणे, बॅंकेतील कर्जाचा बोजा उतरवणे यासह इत्यादी महत्त्वाच्या कामासाठी आता तलाठी कार्यालयात अर्ज करण्यासाठी जावे लागणार नाही.

यासाठी भूमी अभिलेख विभागाने ई-हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याबरोबरच अर्जामध्ये जर कोणत्याही प्रकारची त्रुटी असेल, तर ती त्रुटी तलाठ्याकडून या पोर्टलवर अर्जदाराच्या लॉगिनमध्ये कळविण्यात येणार आणि त्या त्रुटीची पूर्तता देखील अर्जदाराला तेथेच करता येण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे.

फेरफार नोंदी करण्यासाठी तलाठ्यांकडे अर्ज दाखल करावा लागतो. परंतु आता तलाठ्याकडे न जाता नोंदीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी राज्य शासनाने आता ई-हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत दोन कोटींहून अधिक ऑनलाइन फेरफार नोंदविण्यात आले आहेत. तर फेरफारापैकी केवळ साडे सव्वीस लाख नोंदी या नोंदणीकृत दस्ताच्या आधारे झाल्या आहेत.

ऑनलाईन अर्ज केल्यावर अर्जदार हे कधीही जाऊन आपला अर्ज दाखल करू शकतात आणि तलाठी हा अर्ज कधीही पाहून त्याच्यावर अर्ज मंजुरीची प्रक्रिया करू शकतात. त्यामुळे वारसाची नोंद करण्यासाठी किंवा मयताचे नाव कमी करण्यासाठी तलाठ्याच्या कार्यालयात जावे लागणार नाही, तर केवळ या संकेतस्थळाला भेट देऊन तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडून त्यावर फेरफार अर्जाची परिपूर्ण माहिती भरल्यानंतर हा अर्ज थेट तलाठ्याच्या लॉगिनमध्ये दिसेल आणि तो अर्ज मंजूर करून तलाठी ती फेरफार नोंद करू शकेल, अशी माहिती भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

सर्व माहिती एसएमएसद्वारे मिळेल -

https://pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एखाद्या अर्जदाराने फेरफारासाठी अर्ज दाखल केला. तो अर्ज स्वीकृत झाला. तर त्याचा एसएमएस देखील अर्जदाराला येणार आहे. त्याच्यामध्ये फेरफारचा क्रमांक देखील नमूद असेल. जर अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर तो त्रुटी पूर्ततेसाठी परत केल्याची माहिती सुद्धा एसएमएसद्वारे त्या अर्जदाराने जो मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे, त्यावर मिळेल. त्यामुळे हे संकेतस्थळ नुसतेच अर्ज दाखल करण्याच माध्यम नसून यामध्ये आपल्या अर्जाची काय प्रगती झालेली आहे, त्याची माहिती देखील संबंधित अर्जदाराला एसएमएसद्वारे देण्याची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे.

ऑनलाइन अर्ज करा -

राज्य सरकारकडून ई हक्क ही एक अत्यंत पारदर्शक, असे माध्यम अर्जदारांना अर्ज दाखल करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या नागरिकांना आपल्या सातबारावर दुरुस्त्या करायचे आहेत, त्या सर्वांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन भूमि अभिलेख विभागाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी सरिता नरके यांनी केले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos