सिरोंचा येथील हजरत बाबा वली हैदर शहा दर्ग्यात आजपासून दोनदिवसीय उर्स


- विविध राज्यातील हजारो भाविक सहभागी होणार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिरोंचा :
शहरात  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आज  रविवार २४ मार्चपासुन  हजरत बाबा वली हैदर शहा दर्ग्यात दोनदिवसीय उर्सचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे उद्या २५ मार्च पर्यंत   भाविकांची सिरोंचा येथे गर्दी राहणार आहे. उर्ससाठी  महाराष्ट्र,छत्तीसगड,आंध्रप्रदेश,तेलंगाणा, ओडीसा या पाच राज्यातून भाविक येत असल्याने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जात असतो. सिरोंचा येथील उर्स महाराष्ट्रात नागपूर नंतर मोठा उर्स समजल्या जातो.
  हजरत  वली हैदर शाह रहमतुल्लाह अलैह हे १६९८ मध्ये सिरोंचा येथे आले होते. शेकडो वर्षापुर्वी सुरू करण्यात आलेले उर्स आताही जल्लोषात  साजरा केला जातो. हा उर्स अद्यापही विदर्भात प्रसिद्ध आहे. शेकडो वर्षापूर्वी नदी काठी वसलेल्या सिरोंचा शहराची लोकसंख्या शेकडोच्या घरात होती. तेव्हा वली हैदर शाह बाबा यांचा मुक्काम ताडाच्या झाडाखाली असायचा. त्यामध्ये टेकडीवर असलेल्या  दर्ग्याच्या ठिकाणी त्यांनी जिवंत समाधी घेतली. विशेष म्हणजे उर्दू  महिन्यातच उर्स येतो. या वर्षी हा उर्स मार्च २४,२५ असा दोन दिवस साजरा करण्यात येणार आहे. आज २४ मार्चला सांयकाळी गावात कव्वालीच्या आवाजात जल्लोषात मिरवणूक काढून दर्ग्यामध्ये प्रवेश केला जातो. या वली हैदर शाह  बाबाच्या चादरला स्पर्श करून भाविक दर्शन घेतात. उर्समध्ये सर्वधर्मीय भाविक सहभागी होत असतात. उर्स दरम्यान सिरोंचा येथे अनेक प्रकारची दुकाने थाटली जातात. उर्स बघणासाठी येणाऱ्या  भक्तांसाठी मनोरंजन म्हणुन दोन  दिवस कव्वालीच्या मुकाबल्याचे आयोजन केले जात असते. या वर्षी देसाईगंज येथील छोटा मजीद शोला व वाराणसी येथील बेबी शहनाज ताज यांची कव्वाली होणार आहे. मंगळवार २६ मार्च रोजी झेंडा अवतरण होते. या झेंड्याचे कापड  भक्तांना वाटप केले जाते.  भाविकांना त्रास होऊ नये म्हणुन सिरोंचावासीयांनी सहकार्य  करावे तसेच भाविकांनी नदी ओलांडतांना काळजी घ्यावी. काही अडचण भासल्यास स्वयसेवकांचे सहकार्य घ्यावे असे आवाहन उर्स  कमेटिचे अध्यक्ष मोहम्मद मीरजहॉन
यांनी केले आहे.     Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-24


Related Photos