बिएसएनएलचा रामभरोसे कारभार, ब्राॅडबॅन्ड सेवा ढासळली


- नियमित देयके भरूनही ग्राहकांना मिळते अपुरी सेवा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
संपूर्ण देशभरातील कानाकोपऱ्यात  सेवा पुरविणारी दुरसंचार कंपनी म्हणून सरकारी कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडचे नाव घेतले जात होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात बिएसएनएलचा कारभार रामभरोसे असल्याचे दिसून येत असून ब्राॅडबॅन्ड सेवा घेतलेल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नियमित देयके भरूनही अपुरी सेवा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात २ हजार २०० हून अधिक ब्राॅडबॅन्ड चे ग्राहक आहेत. या ग्राहकांच्या मार्फतीने १ कोटी ७५  लाखांहून अधिक महसूल भारत संचार निगम लिमिटेड कंपनीला मिळतो. विदर्भात सर्वाधिक महसून बिएसएनएलला गडचिरोली जिल्ह्यातून मिळतो. असे असतानाही सेवेत अनियमितता केली जात असल्यामुळे ग्राहकांनी खासगी कंपन्यांचा आधार घेण्याचे सुरू केले आहे. 
गडचिरोली येथील बिएसएनएलच्या एक्सचेंज कार्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षात कार्यरत कर्मचारी एका ग्राहकाचे केबल दुसऱ्या ग्राहकास जोडून देत असल्याचेही निदर्शनास आले आहे. एखादा जवळचा ग्राहक तक्रार घेवून गेल्यास दुसऱ्या ग्राहकाच्या केबलवरून त्याला सेवा देवून त्याचे समाधान केले जाते. यामुळे दुसऱ्या ग्राहकास नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेक ग्राहक तक्रार करतात. मात्र तक्रारींचे निरसन वेळेवर केले जात नाही. तक्रारीसाठी दुरध्वनीवर संपर्क साधल्यास प्रतिसाद दिल्या जात नाही. कधी - कधी बिएसएनएलचे कर्मचारी तक्रार केलेल्या ग्राहाकांपर्यंत जातही नाहीत. आलेच तरी चिरीमिरी घेवून काम करून देण्याचा प्रयत्न करतात. यामुळे ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागतो. 
दिवसातून अनेकदा इंटरनेट बंद - चालू होत असते. यामुळे शासकीय, निमशाकीय कार्यालये, खासगी संस्थांमधील कामांना ब्रेक लागतो. विद्यार्थ्यांची कामे होत नाहीत. अनेकदा तक्रारी करूनही ग्राहकांना योग्य सेवा मिळत नाहीत. तक्रार केल्यास ग्राहकांना एफटीपी लावण्याचे सांगण्यात येते. मात्र हे काम खासगी कंपनीकडे असल्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. केवळ बिएसएनएलकडून एफटीपी लावण्याचे सांगून हात झटकण्याचे काम केले जात आहे. यामुळे बीएसएनएल ने संपूर्ण काम खाजगी कंपन्यांमार्फत करावे किंवा सेवाच बंद करावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-24


Related Photos