मासोळ्या पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा विद्युत प्रवाहाने मृत्यू, भयभित झालेल्या मित्रांनी लावली मृतदेहाची विल्हेवाट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / विरूर (स्टे.) :
तीन मित्र होळी सणानिमित्त मासोळ्या पकडण्यासाठी नाल्यावर गेले. नाल्यालगत  असलेल्या विजप्रवाहावरून वायर टाकून विजप्रवाहाने मासे पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच एका मित्राचा विद्यूत प्रवाहाचा झटका लागून मृत्यू झाला. यामुळे गोंधळ उडालेल्या आणि भयभित झालेल्या दोन मित्रांनी मृतदेह खड्ड्यात टाकून विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे.
सदर घटना राजुरा तालुक्यातील थोमापूर येथे घडली आहे. सोमला संज्या मालोत (३८) असे मृतक युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक सोमला मालोत हा बाळू बानोत, मारोती गाजुलवार या दोघांसोबत चिंचोली - सुब्बई जंगलालगतच्या नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेला होता. नाल्यालगत असलेल्या विज प्रवाहावरील तारांना वाय जोडून विजप्रवाह पाण्यात सोडला. या द्वारे मासे पकडण्याचा त्यांचा बेत होता. मात्र विजप्रवाह सुरू होताच सोमला मालोत याला विजेचा धक्का बसला आणि तो जागीच गतप्राण झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बाळू बानोत आणि मारोती गाजुलवार हे दोघेही गोंधळून गेले. ही बाब गावात माहिती होईल आणि पोलिस अटक करतील या भितीने त्यांनी जवळील विहीरीसारख्या असलेल्या खड्ड्यात त्याचा मृतदेह टाकून दिला व गावात परतले.
मृतक सोमला मालोत हा २२ मार्चपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटूंबीयांनी विरूर पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता चौकशीदरम्यान २२ मार्च रोजी मृतक सोमला हा त्याचे मित्र बाळू बानोत आणि मारोती गाजुलवार यांच्यासोबत मासोळ्या पकडण्यासाठी गेला होता, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बाळू बानोत याला ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविला. त्याने घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेत ताब्यात घेतले. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथे पाठविले. वृत्त लिहीपर्यंत बाळू बानोत हा पोलिसांच्या ताब्यात असून मारोती गाजुलवार हा फरार आहे. दोघांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार कृष्णकुमार तिवारी, वडतरकर, प्रशांत बावणे, सचिन पडवे, मुंडे करीत आहेत.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-24


Related Photos